*बार्शीत अवैध पिस्तूलसह युवकाला अटक; पोलिसांची धडक कारवाई*
*बार्शीत अवैध पिस्तूलसह युवकाला अटक; पोलिसांची धडक कारवाई*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी* दि. १४ : बार्शी शहरातील राणी लक्ष्मीबाई उद्यान परिसरात पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एका युवकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले. या प्रकरणी भारतीय शस्त्र कायद्याच्या कलम ३ आणि २५ तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय अधिकारी अशोक सायकर आणि पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली. दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सोलापूर रोडवरील उद्यान परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस हवालदार प्रवीण साठे, अमोल माने, सचिन देशमुख, अंकुश जाधव, अजीज शेख, बाळकृष्ण मुठाळ, अविनाश पवार, राहुल उदार, सचिन नितनात, इसामिया बहिरे, सतीश उघडे आणि वैभव भांगे यांचा समावेश होता.
पोलिसांनी रोहित संतोष मारकड (वय २१, मूळ रा. उपळाई रमाळा, ता. कळंब, जि. धाराशिव; सध्या रा. चोरमोले प्लॉट, बार्शी) याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल (मॅगझिनसह) आणि एक जिवंत काडतूस आढळले. हे शस्त्र विनापरवानगी आणि बेकायदेशीरपणे बाळगलेले असल्याचे निष्पन्न झाले. बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६८/२०२६ नोंदवण्यात आला असून, पुढील तपास उमाकांत कुंजीर करत आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध शस्त्रे किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा ११२ क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी. माहिती गोपनीय ठेवली जाईल. अवैध शस्त्रे समाजासाठी धोकादायक असल्याने सतर्क राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अवैध शस्त्रांविरोधातील मोहिमेचा भाग आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या