**बार्शी : अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने केला विनयभंग; आईने दिला छुपा पाठिंबा, दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा**
**बार्शी : अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने केला विनयभंग; आईने दिला छुपा पाठिंबा, दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी* (सोलापूर) : बार्शी शहरातील एका ११ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात मुलीच्या शेजारी राहणारा आरोपी आणि तिची स्वतःची आई यांच्यावर पोक्सो कायद्याखालील कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी इयत्ता पाचवीत शिकते.
२२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी चारच्या सुमारास पीडितेचे वडील कामावर आणि भावंडे बाहेर असताना आरोपीने घरात घुसून मुलीला एकटी असल्याचे पाहताच तिला जबरदस्तीने मांडीवर बसवले आणि लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. मुलीने लगेच आईला ही बातमी सांगितली, पण आईने आरोपीला विरोध करण्याऐवजी “तो तुझा मामा आहे, काहीही होत नाही” असे म्हणत मुलीला गप्प बसवले.
दुसऱ्या दिवशी आरोपीने आईसमोरच मुलीचा गाल पकडून अश्लील बोलणे केले, तरी आईने त्याकडे दुर्लक्ष केले. २३ फेब्रुवारीच्या रात्री मुलीने आई आणि आरोपीला संशयास्पद स्थितीत पाहिले. तेव्हा आरोपीने मुलीचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी दिली. आईनेही “वडिलांना सांगितलेस तर आम्ही दोघेही तुला मारून टाकू” अशी भीती घातली.
नंतर आई घरातून बेपत्ता झाली. वडिलांनी हरवल्याची तक्रार दिल्यानंतरही आरोपी वडिलांना फोन करून मुली आणि आईबद्दल अश्लील शिवीगाळ करत दमदाटी करत होता. या सततच्या त्रासाने हैराण झालेल्या मुलीने अखेर वडिलांना सर्व हकीकत सांगितली आणि बार्शी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरून मुख्य आरोपी आणि त्याच्या कृत्याला साथ देणाऱ्या आईविरुद्ध तातडीने गुन्हा नोंदवला. मुलीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली असून, दोघांवर कठोर कारवाई सुरू आहे. तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या