*बार्शी बसस्थानकाचा कायापालट: १० कोटी ७७ लाखांच्या निविदेनंतर आधुनिक इमारतीचे स्वप्न अंतिम टप्प्यात*

*बार्शी बसस्थानकाचा कायापालट: १० कोटी ७७ लाखांच्या निविदेनंतर आधुनिक इमारतीचे स्वप्न अंतिम टप्प्यात* 

*KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी)*: बार्शीकरांना गेल्या अनेक वर्षांपासून अपेक्षित असलेले भव्य, सुसज्ज आणि आधुनिक बसस्थानक लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) च्या बार्शी आगाराची पुनर्बांधणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, अंतरिम मंजुरीनंतर ३डी आर्किटेक्चरल आणि इन्फ्रास्ट्रक्चरल डिझाइन जाहीर करण्यात आले आहे. लवकरच वर्क ऑर्डर काढून प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणार आहे.

माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या आमदारकीत या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे महायुती सरकारने प्रारंभी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. नंतर डिसेंबर २०२५ मध्ये १० कोटी ७७ लाख रुपयांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या. या निविदांमुळे प्रकल्पाला ठोस गती मिळाली आहे.

नव्या बसस्थानकात प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यात प्रशस्त प्रतीक्षागृह, सुबक तिकीट काऊंटर, स्वच्छतागृहे, महिला विश्रांतीगृह, ज्वेलरी लॉकर रूम, रिझर्वेशन आणि पार्सल ऑफिस, ट्रॅफिक कंट्रोल रूम, चालक-वाहकांसाठी विश्रांती कक्ष यांचा समावेश आहे. इमारत ग्राउंड प्लस दोन मजले असणार असून, कर्मचाऱ्यांसाठी दोन मजली निवासस्थाने, व्यावसायिक शेड्स, वर्कशॉप, सुपरवायझर रूम, बॅटरी रूम, आंतररिक काँक्रिटीकरण आणि कंपाऊंड भिंत बांधण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म्सही नव्याने विकसित होतील.

या प्रकल्पामुळे बार्शीचे प्रवासी वाहतूक केंद्र अधिक आकर्षक आणि सुविधायुक्त होणार असल्याचे बार्शीकरांचे मत आहे. काम पूर्ण झाल्यावर बार्शीच्या वैभवात निश्चितच भर पडेल.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल