*बार्शी शहरात गोवंश कत्तल आणि अवैध वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल; दोन जनावरे जप्त, स्विफ्ट कारसह मुद्देमालाची किंमत ३.४३ लाख*
*बार्शी शहरात गोवंश कत्तल आणि अवैध वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल; दोन जनावरे जप्त, स्विफ्ट कारसह मुद्देमालाची किंमत ३.४३ लाख* *KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी): बार्शी शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी ताब्यात ठेवण्याचा आणि अवैध वाहतुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२५, ३(५) अन्वये तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९७६ चे कलम ५(ब), ५(क), ९, ९(अ) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्याच्या कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४.११ वाजता मंगळवार पेठ परिसरात हा प्रकार घडला. पोलीस शिपाई विशाल दिलीप देशमुख (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात आरोपींनी गोवंश जातीच्या दोन जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस आणि अवशेष अवैधरित्या वाहतुकीसाठी तयार केले होते. घटनास्थळी जनावरांचे मुंडके अर्धवट कापलेले, चारही पाय वेगळे केलेले आणि अर्धवट चामडी सोललेली अवस्था आढळली. प्रत्येक जनावराचे अंदाजे वय १० वर्षे आणि वजन १०० किलो असून, त्यांची एकत्रित किंमत ४०,००० रुपये आहे.
या कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल असा आहे: गोवंश जातीच्या जनावरांचे आठ पाय (एकूण वजन १६ किलो, किंमत ३,२०० रुपये) आणि मारुती सुझुकी स्विफ्ट कार (क्रमांक MH १५ DC ६८९०, काळ्या रंगाची, किंमत ३,००,००० रुपये). एकूण जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ३,४३,२०० रुपये आहे. या वाहनाचा वापर मांस वाहतुकीसाठी करण्यात आला असून, चालक आणि मालक अद्याप अज्ञात आहेत.
पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ १६५१ केकाण यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे. संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले असून, वर्दी रिपोर्ट न्यायालयात सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहर पोलीस प्रशासनाने या प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या