*७२ वर्षीय आजोबांनी ठणकावले: निकृष्ट कामे, बोगस बिले – मरायला तयार, पण भ्रष्टाचार सहन करणार नाही!*

*७२ वर्षीय आजोबांनी ठणकावले: निकृष्ट कामे, बोगस बिले – मरायला तयार, पण भ्रष्टाचार सहन करणार नाही!* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. २७ : बार्शी तालुक्यातील भोईंजे गावात भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाच्या विकासकामांविरोधात ७२ वर्षीय सौदागर विष्णू डांगरे यांनी रामलिंग मंदिरात २५ फेब्रुवारीपासून अमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस सुरू असून, त्यांच्या ठाम भूमिकेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप आणि पाठिंब्याची लाट पसरली आहे.

डांगरे यांनी स्पष्ट सांगितले की, गावातील प्रत्येक विकासकाम ठेकेदारांच्या खिशात जाण्यासाठी केले गेले आहे, लोकांच्या हितासाठी नव्हे. मुख्य आरोप आणि तक्रारी खालीलप्रमाणे:

- शासनाच्या आदेशानुसार ठेवायच्या कचराकुंड्या योग्य ठिकाणी नसल्याने गावात घाणीचे साम्राज्य.
- भुयारी गटारीसमोर चुंबळीचे स्वीस खड्डे बांधणे अनिवार्य असताना ते पूर्णपणे दुर्लक्षित; खड्डे कच्च्या, निकृष्ट विटांनी बांधले.
- राष्ट्रीय महामार्गाशेजारील गट नंबर ५७ मधील जमिनीवर सडकेपासून फक्त ५-६ फूट अंतरावरच खड्डे कच्च्या विटांनी उभारले – सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर.
- भुयारी गटारीचे कामच केले नाही, तरीही बोगस बिले उचलून पैशांची लूट.
- पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधलेली नवीन टाकी चुकीच्या जागी उभी; टाकीच्या १०-१५ फूट अंतरावरच घर असताना ती दोन वर्षांपूर्वी बांधून पूर्ण झाली, पण अद्याप एक थेंब पाणी सोडले नाही. टाकी एका बाजूला झुकलेली असल्याने कोसळण्याचा धोका; जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?

“हे सर्व काम लोकांच्या पैशातून होत असताना ठेकेदार आणि अधिकारी मिळून लूट करतायत. कामाची हमी, दुरुस्ती आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत मी इथून हलणार नाही. मेलो तरी चालेल,” अशी आक्रमक भूमिका डांगरे यांनी घेतली आहे.

डॉ. ताकभते यांनी नियमित भेटी देऊन प्रकृती तपासली असून, उपोषणकर्त्यांची तब्येत स्थिर आहे. गावकरी आणि परिसरातील नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, प्रशासनाकडून तात्काळ दखल घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भ्रष्टाचाराविरुद्धचा हा लढा आता केवळ एका आजोबांचा नसून, संपूर्ण गावाचा बनला आहे. प्रशासन जागे होईल की उपोषणकारकांचे प्राण जाईल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**