*बार्शीत शिवजयंतीनंतर हिंसाचाराची मालिका; मारहाण, दगडफेक अन् रुग्णालयाची तोडफोड*
*बार्शीत शिवजयंतीनंतर हिंसाचाराची मालिका; मारहाण, दगडफेक अन् रुग्णालयाची तोडफोड*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), दि. २३ :*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरात आयोजित कार्यक्रमानंतर किरकोळ वादाचे पर्यवसान गंभीर हिंसाचारात झाले. रविवारी रात्री सलग तीन ठिकाणी मारहाण, दगडफेक आणि शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, प्रत्यक्ष १५ आणि अज्ञात १४ अशा एकूण २९ जणांवर कारवाई सुरू आहे. पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या तिन्ही घटना एकमेकांशी जोडलेल्या आहेत. बार्शीतील बारंगुळे प्लॉट येथे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना फटाके फोडण्यावरून दोन गटांमध्ये भांडण उफाळले. यात एका तरुणाला आणि त्याच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सोमेश्वर स्वामी यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १९१(१), १९१(२), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये ९ ज्ञात आणि ३ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला.
पहिल्या घटनेनंतर दोन्ही गट बार्शी पोलिस ठाण्यासमोरील स्टँड चौकात समोरासमोर आले. येथे मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि दगडफेक झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली. पोलिस राहुल उदार यांच्या फिर्यादीवरून बीएनएस कलम १९४(२), १८९(२), १८९(३), १९१(१), १९१(२) अन्वये ६ ज्ञात आणि ३ अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला.
तिसऱ्या घटनेत, पहिल्या मारहाणीतील जखमी व्यक्ती वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात गेल्याची माहिती विरोधी गटाला मिळताच, जमावाने तेथे हल्ला केला. मुख्य प्रवेशद्वाराची काच, ऑपरेशन थिएटर आणि प्रसूतीगृहाच्या दरवाज्यांवर दगडफेक झाली, तसेच बाहेरील फर्निचरचे नुकसान करण्यात आले. यामुळे रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कर्मचारी राहुल सोलंकी यांच्या तक्रारीवरून सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ कलम ३(१) आणि बीएनएस कलम ३(१), १२५, ३२४(४), ३२४(५), १८९(२), १८९(३), १९१(१), १९१(२) अन्वये ७ ते ८ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी रविवारी मध्यरात्री घटनास्थळी भेट दिली. सोमवारी सकाळी ११ वाजता सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पाहणी करून शांतता समितीची बैठक घेतली. त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर आणि पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनीही संयमाचे आवाहन करत साजन शेख, शाहिद शेख, आरिफ सय्यद, अफरोज बागवान, मोजम बागवान या पाच आरोपींना अटक केल्याचे सांगितले.
तपास पोलिस सहायक निरीक्षक बाळासाहेब जाधव, उमाकांत कुंजीर आणि उपनिरीक्षक अभय माकणे करत आहेत. शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सोलापूरहून दंगा नियंत्रक पथकाचे १५ जवान आले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या