*नांदेड येथे २०व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांना जीवनगौरव पुरस्कार*
*नांदेड येथे २०व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांना जीवनगौरव पुरस्कार*
*KDM NEWS प्रतिनिधी नांदेड, ता. २७ : विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित २०व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात बार्शीचे ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. २७, २८ फेब्रुवारी व १ मार्च या तीन दिवसांत नांदेडच्या सायन्स कॉलेज ग्राउंडवर होणाऱ्या या संमेलनात हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
कॉम्रेड ठोंबरे यांनी सातत्याने मार्क्स-फुले-आंबेडकरवादी विद्रोही विचारधारेने दलित, कामगार, शेतकरी, विद्यार्थी व युवक चळवळींमध्ये सक्रिय योगदान दिले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. २००५ साली सोलापूर येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजन त्यांच्या नेतृत्वाखाली झाले होते, जे जिल्ह्यातील सर्वात गाजलेले संमेलन ठरले. २०१५ मध्ये बार्शी येथे झालेल्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे ते संयोजन समिती अध्यक्ष होते.
त्यांच्या साहित्यिक योगदानात महात्मा फुले यांच्या शैक्षणिक भूमिकेवर, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकरांच्या साहित्यविचारांवर, शाहीर अमर शेख, कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य व कॉम्रेड ए.बी. बर्धन यांच्यावर आधारित पुस्तके समाविष्ट आहेत. महात्मा फुले यांनी प्रस्थापित साहित्यिकांवर घेतलेल्या बहिष्काराच्या भूमिकेला पुढे नेत विद्रोही साहित्य संमेलनाची परंपरा त्यांनी सातत्याने जोपासली.
या संमेलनाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत (नागपूर), उद्घाटक म्हणून डॉ. बजरंग बिहारी तिवारी (दिल्ली) तर स्वागताध्यक्षपदी राहुल प्रधान यांची नेमणूक झाली आहे. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मिलिंद आव्हाड (जेएनयू, दिल्ली), विद्रोही साहित्य संस्कृती सभेच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी व राज्य संघटक किशोर धमाले यांची उपस्थिती राहणार आहे. पुरस्कार वितरण या मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.
संमेलनात संविधान मूल्ये, समता, न्याय व विद्रोही विचारांचा जागर होणार असून, परिसंवाद, कवी संमेलने, नृत्यनाट्य, एकांकिका व पुस्तक प्रकाशनासारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ठोंबरे यांच्या जीवनकार्याचा गौरव करताना विद्रोही चळवळीला नवी दिशा मिळेल, असे संयोजकांनी सांगितले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या