**सोलापूर : २३ मार्चपासून गॅस सिलेंडर फक्त ऑनलाइन बुकिंगनंतर ९६ तासांत घरपोच; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे कडक निर्देश**
**सोलापूर : २३ मार्चपासून गॅस सिलेंडर फक्त ऑनलाइन बुकिंगनंतर ९६ तासांत घरपोच; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे कडक निर्देश**
*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, १८ मार्च २०२६ : गुढी पाडवा (१९ मार्च) आणि रमजान ईद (२१ मार्च) नंतर २३ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनी रांगा लावून सिलेंडर वाटप बंद करावे. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर ओटीपीद्वारे ९६ तासांत घरपोच सेवा अनिवार्य; एकाही एजन्सीसमोर नागरिकांना उभा राहता येणार नाही, असे कडक निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हा परिषद सभागृहात आज आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी गॅस वितरणाबाबत एकसूत्री धोरण जाहीर केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, एलपीजी जिल्हा समन्वयक भुकय्या रघुकुमार, एचपीसीएल-बीपीसीएल-आयओसीएल प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील गॅस एजन्सींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, “जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा मागणीप्रमाणे सुरळीत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. २३ मार्चपासून कोणत्याही एजन्सी किंवा गोदामातून थेट वितरण बंद. सर्वत्र ऑनलाइन बुकिंग अनिवार्य. बुकिंगनंतर एजन्सीने ९६ तासांत घरपोच सिलेंडर पोहोचवावे. एजन्सी व गोदामासमोर ‘ऑनलाइन बुकिंग करा, घरपोच मिळेल; एजन्सीत सिलेंडर मिळणार नाही’ असे बोर्ड लावणे बंधनकारक. ग्राहकांना एसएमएस पाठवून सूचना द्या.”
ते पुढे म्हणाले, “दुसरा सिलेंडर शहरी भागात २५ दिवसांत, ग्रामीण भागात ४५ दिवसांत मिळेल याचे काटेकोर पालन करा. अवैध विक्री रोखण्यासाठी एजन्सींनी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे. संशयास्पद घटना तत्काळ प्रशासनाला कळवा. संवेदनशील एजन्सींसाठी पोलीस संरक्षण मिळेल.”
रमजान ईद व गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने शहर व ग्रामीण भागातील गॅस एजन्सी भागात विशेष पेट्रोलिंग करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक ९७६९९१९२२१ उपलब्ध असल्याचे सांगितले.
एलपीजी समन्वयक रघुकुमार यांनी सांगितले, “एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल यांच्या सूचनांनुसार २३ मार्चपासून ओटीपी प्रणालीने ९६ तासांत वितरण केले जाईल. मागणीप्रमाणे पुरवठा उपलब्ध आहे.”
प्रारंभी सरडे यांनी ग्रामीण भागातील स्थिती, तर पडोळे यांनी शहरातील पुरवठ्याची माहिती दिली. बैठकीत जिल्ह्यात दररोज २० हजार सिलेंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
नागरिकांनी घाबरू नये, ऑनलाइन बुकिंग करावे व ९६ तास प्रतीक्षा करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या