**कलेच्या नावाखाली चालणारे वेश्या रॅकेट उघड; मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्रावर पोलिसांची धाड, २५ महिलांची सुटका**
**कलेच्या नावाखाली चालणारे वेश्या रॅकेट उघड; मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्रावर पोलिसांची धाड, २५ महिलांची सुटका**
**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** माढा तालुक्यातील मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्र नृत्य-मनोरंजनाच्या आडून मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा प्रकार सोलापूर ग्रामीण पोलिसांनी १५ मार्च मध्यरात्री उघडकीस आणला. टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या पथकाने गोपनीय माहितीवर आधारित सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत २५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली, तर एका महिलेसह सहा आरोपींना अटक करण्यात आली.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी राहुल आत्राम यांच्या नेतृत्वात ही नियोजनबद्ध कारवाई झाली. आरोपींवर मानवी तस्करी व अनैतिक व्यापाराच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. माढा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी. कुलकर्णी यांनी आरोपींना १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सुटका झालेल्या सर्व २५ महिलांना न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर येथील सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
अटक झालेल्या आरोपींमध्ये केंद्राचे मालक जगन्नाथ तुकाराम घाडगे (रा. अरण, ता. माढा), चालक विशाल लता पवार (वय २४, रा. जामखेड, ता. अहिल्यानगर), मॅनेजर बाळासाहेब गोविंद गिड्डे (वय ६३, रा. अरण, ता. माढा), पार्टी मालकीन छाया बाळासाहेब सुरवसे (वय ३५, रा. आंबेजोगाई, जि. बीड), रिक्षाचालक नितीन चांगदेव चव्हाण (वय ४९, रा. मोडनिंब, ता. माढा) आणि स्वागत लॉज मॅनेजर सिध्दांत सुखदेव गायकवाड (वय ३३, रा. मोडनिंब, ता. माढा) यांचा समावेश आहे.
केंद्रातून मोठ्या प्रमाणात अश्लील साहित्य, मोबाइल फोन आणि रेकॉर्डिंग डिव्हाइसेस जप्त करण्यात आले. पर जिल्हा व पर राज्यातून महिलांना बाहेरून आणून येथे कोंडून ठेवण्यात येत होते. नृत्याच्या नावाखाली ग्राहकांसोबत अनैतिक कामे करण्यास भाग पाडले जात होते. आर्थिक फायद्यासाठी हे रॅकेट चालविले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
या कारवाईत विशेष लक्ष वेधले गेले ते बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित नर्तिका पुजा गायकवाड यांच्याकडे. तीही २५ पीडितांमध्ये होती. पुजा ही धाराशिव जिल्ह्यातील पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्रात काम करत असताना बर्गे यांच्याशी प्रेमसंबंधात आली होती. नंतर बर्गे यांनी बार्शी परिसरात डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. पुजा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती; जामिनावर सुटल्यावर ती स्वरांजली केंद्रात आली असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. या प्रकाराने जिल्हाभर खळबळ उडाली आहे.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या अवैध धंद्यांविरुद्धच्या धोरणामुळे धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांवरही कारवाई झाली होती. चोराखळी येथील महाकाली केंद्र वगळता पाच केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील या रॅकेटमुळे कला केंद्रांच्या नावाखाली चालणाऱ्या गैरव्यवहारांवर आता अधिक कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. तपास सुरू असून आणखी आरोपींना जेरबंद करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या