"पेट्रोल-डिझेल-गॅस पुरेसा साठा; गर्दी केल्यास थेट कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा"
जिल्हा प्रशासनाने २३ मार्च रोजी दिलेल्या या आदेशात गॅस एजन्सींसमोर गर्दी टाळण्यासाठी कडक सूचना देण्यात आल्या आहेत. गॅस सिलिंडरचा घरपोच पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश एजन्सींना देण्यात आले असून, एजन्सीच्या गोदामासमोर गर्दी केल्यास किंवा अवैध विक्री केल्यास संबंधित एजन्सीवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, “जिल्ह्यात इंधन आणि गॅसचा साठा पुरेसा आहे. नागरिकांनी अफवांमुळे पेट्रोल पंपांवर किंवा गॅस एजन्सींवर अनावश्यक गर्दी करू नये. यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते आणि सामान्य नागरिकांना अडचण येते.”
आदेशातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे:
- पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा नसल्याने घाईघाईने खरेदी किंवा साठवणूक करू नये.
- गॅस एजन्सींनी नोंदणी केल्यानंतर सिलिंडर घरपोच देण्याची व्यवस्था करावी.
- एजन्सीसमोर गर्दी होऊ नये; अवैध गॅस विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई.
- अत्यावश्यक सेवेतील वाहने (पेट्रोल-डिझेल टँकर, गॅस ट्रक) अडवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल.
प्रशासनाने युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून पुरवठा यंत्रणा सज्ज ठेवली असून, कोणत्याही अडचणींसाठी २४ तास आपत्कालीन कक्ष कार्यान्वित केला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनीही सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.
नागरिकांनी या आदेशाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आवाहन केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या