**प्रांताधिकाऱ्याला लाच घेताना अटक ! महसूल विभागात खळबळ! प्रांताधिकारी शिंदे २ लाखांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात**
**प्रांताधिकाऱ्याला लाच घेताना अटक ! महसूल विभागात खळबळ! प्रांताधिकारी शिंदे २ लाखांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात**
**KDM NEWS प्रतिनिधी मंचर (पुणे) :** उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर-आंबेगाव उपविभागीय महसूल कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. आंबेगावचे प्रांताधिकारी गोविंद पांडुरंग शिंदे (वय ४६) यांना शुक्रवारी (२७ मार्च २०२६) दुपारी मंचर येथील कार्यालयात २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यासह लिपिक राहुल खैरनार यांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर झालेल्या थेट कारवाईमुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे.
प्रकरण नेमके काय आहे? नारायणगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाने (भागीदारी फर्मचे मालक) पुणे-नाशिक महामार्गालगत जमीन विकास नियमांनुसार निवासी इमारत बांधली होती. इमारतीचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असताना पूर्णत्व दाखला (बिल्डिंग कंप्लिशन सर्टिफिकेट) आणि संबंधित कागदपत्रे, नोंदी पूर्ण करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. यासाठी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सुरुवातीला ५ लाख रुपयांची लाच मागितली. नंतर तडजोडीअंती २ लाख रुपयांवर तोडगा निघाला. या मागणीमुळे व्यावसायिकाने थेट एसीबीकडे तक्रार दाखल केली.
एसीबी पुणे पथकाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी दुपारी सापळा रचला. मंचर येथील उपविभागीय कार्यालयात तक्रारदाराकडून २ लाख रुपये स्वीकारत असताना प्रांताधिकारी शिंदे आणि लिपिक राहुल खैरनार यांना रंगेहात पकडले. एसीबी पथकाने दोघांना ताब्यात घेतले आणि बेड्या ठोकल्या. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास एसीबी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून सुरू असून, प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
प्रांताधिकारी गोविंद शिंदे हे जुन्नर-आंबेगाव उपविभागाचे प्रमुख अधिकारी असून, महसूल विभागातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी पुणे यांच्या पथकाने पार पाडली. महसूल विभागातील अशा प्रकारची थेट कारवाई दुर्मीळ असल्याने पुणे जिल्ह्यातील महसूल यंत्रणेत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या