**नाशिक : तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतून काढलेला ‘एल्विश हनी’; एक किलोला ९ लाखांचा दर, भाविक-उद्योजक-नेत्यांना गंडा**
**नाशिक : तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतून काढलेला ‘एल्विश हनी’; एक किलोला ९ लाखांचा दर, भाविक-उद्योजक-नेत्यांना गंडा**
**KDM NEWS प्रतिनिधी**नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याने बलात्कार प्रकरणात अटक झाल्यानंतर आता त्याच्या आणखी एका मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत उघडकीस आले की, खरात ‘तुर्की मध’च्या नावाखाली शक्तिवर्धक आणि कामोत्तेजक मध विकत होता. हा मध तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहांमधून मिळतो, अत्यंत दुर्मिळ आणि लैंगिक शक्ती वाढवणारा असल्याचा बनावट दावा करून तो एका किलोच्या बाटलीला तब्बल ९ लाख रुपये घेत होता.
खरातने या मधाला ‘एल्विश हनी’ असे ब्रँड नाव दिले होते. तो ग्राहकांना सांगत असे की, हा मध फक्त तुर्कीच्या विशिष्ट समुद्री गुहेतून मिळतो आणि त्यात अशी औषधी शक्ती आहे की, लैंगिक अडचणी, शारीरिक अशक्तपणा दूर होतो. मुख्यतः उद्योजक, राजकीय नेते आणि उच्चभ्रू भाविकांना हे मध विकले जात होते. अनेक जण लैंगिक समस्या सोडवण्यासाठी खरातकडे येत आणि तो या मधाची शिफारस करत असे. चौकशीत समोर आले की, मधात काही औषधी गोळ्या मिसळून तो विकला जात होता.
या विक्रीतून मिळालेली कोट्यवधींची रक्कम खरातने आपल्या ‘श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट’च्या खात्यात जमा केली. तपास यंत्रणांचा संशय आहे की, यातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार चालला होता. SIT च्या चौकशीत खरातच्या आर्थिक गैरव्यवहाराचे नवे धागेदोरे समोर आले असून, मध विक्री हे त्याच्या फसवणुकीच्या साखळीतील एक महत्त्वाचे कडी ठरले आहे.
खरात सध्या नाशिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. त्याच्यावर आतापर्यंत ६ गुन्हे दाखल झाले आहेत. यात महिलांवर अत्याचार, जमीन फसवणूक, अघोरी विधींसह आता मध घोटाळ्याचीही चौकशी सुरू आहे. खरातची पोलीस कोठडीची मुदत २४ मार्चला संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात येणार असून, तपास पथक कोठडी वाढवण्याची शक्यता वर्तवत आहे.
खरात हा मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी होता. स्वतःला ‘कॅप्टन’ आणि दैवी शक्तीचा धनी म्हणवून तो वर्षानुवर्षे नाशिकसह परिसरात भोंदूगिरी करत होता. आता SIT च्या सखोल तपासात त्याच्या संपूर्ण नेटवर्कचा छडा लावला जात आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या