**पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार**

**पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार** 

**KDM NEWS प्रतिनिधी पंढरपूर ** पंढरपूर (सोलापूर) - सरकारी उपजिल्हा रुग्णालयात ६ वर्षीय बालकाच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी उजव्या हाताचे दुखरे बोट काढण्याऐवजी डाव्या हाताचे बोट काढून टाकल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने तातडीने चौकशी समिती गठित केली असून, अहवालानंतर संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे.

शाहू सुनील दंदाडे (वय ६, पंढरपूर) या बालकाला जन्मतःच दोन्ही हातांना सहा-सहा बोटे आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या उजव्या हाताच्या अतिरिक्त बोटात वेदना सुरू झाल्याने पालकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. फॉर्मवर उजव्या हाताच्या बोटाबाबतच नोंद असताना डॉ. वर्षा काणे यांनी शस्त्रक्रिया करताना डाव्या हाताचे बोट कापले, असा पालकांचा आरोप आहे.

नातेवाईकांनी सांगितले, “आमचा मुलगा लहान आहे. उजव्या हाताचे बोट दुखत होते, म्हणून आम्ही इथे आलो होतो. फॉर्मवरही उजव्या हाताबद्दलच लिहिले होते. डॉक्टरांकडे फाईल होती. त्यांनी ‘उजव्या हाताचेही बोट काढावे लागेल’ असे सांगितले होते, पण प्रत्यक्षात डाव्या हातावर ऑपरेशन करून बोट काढले. कागदपत्रांमध्ये बदल केल्याचा संशय आहे.”

घटनेची माहिती समजताच रुग्णालयात गदारोळ झाला. पालकांनी तक्रार दाखल केली. वैद्यकीय अधीक्षक विजयकुमार सरडे यांनी याबाबत चौकशी समिती नेमली आहे. सरडे म्हणाले, “समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.”

या घटनेमुळे पंढरपूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सरकारी रुग्णालयातील सेवेच्या दर्जाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. बालकाची सद्य:स्थिती स्थिर असून, पालकांनी पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयाकडे वळण्याची तयारी दर्शवली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**