**शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई२१.४३९ किलो गांजा जप्त; सराईत आरोपी रजाक शेख अटकेत**
**शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. ३० – सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थांच्या विक्री आणि लागवडीच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ४ लाख ३९ हजार ९०० रुपयांचा २१.४३९ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला थोबडे वस्ती, जुना देगांव नाका परिसरात संशयास्पद इसम दिसला. तो झाडाखाली बसून प्लास्टिक पिशवीतून गांजाच्या पुड्या विक्री करत होता. पथकाने त्याला ताब्यात घेतल्यानंतर झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील पिशवीतून २२७ ग्रॅम गांजा सापडला.
चौकशीत आरोपीने आपले नाव रजाक गफुर शेख (वय ४९, रा. थोबडे वस्ती, जुना देगांव नाका, सोलापूर) असे सांगितले. पुढील चौकशीत त्याने आपल्या घराच्या परिसरात गांजाची लागवड केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि ५९ गांजाची झाडे जप्त केली. या झाडांचे वजन २१.२१२ किलो होते. पिशवीतील गांजासह एकूण २१.४३९ किलो गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८७/२०२६ नोंद करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम २०(अ) आणि २०(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्या पथकाने पार पाडली. संपूर्ण मोहिमेचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांनी केले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या