**सोलापूर : घरगुती गॅसचा व्यावसायिक अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई; ४१ सिलिंडर जप्त, गुन्हे दाखल**
**सोलापूर : घरगुती गॅसचा व्यावसायिक अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई; ४१ सिलिंडर जप्त, गुन्हे दाखल**
*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, १९ मार्च २०२६ : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर ताण येत असताना सोलापूर शहरात घरगुती सबसिडी एलपीजी सिलिंडरचा व्यावसायिक वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे उघडकीस आले. यावर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने आज सायंकाळी शहरातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकल्या.
अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने **पार्क चौक, जुळे सोलापूर, डी-मार्ट परिसर, विजापूर रोड आणि धर्मवीर संभाजी (कंबर) तलाव** परिसरातील चायनीज गाड्या, पावभाजी सेंटर आणि इतर व्यावसायिक ठिकाणांना लक्ष्य केले. या कारवाईत एकूण **४१ घरगुती गॅस सिलिंडर** जप्त करण्यात आले. यापैकी फौजदार चावडी (सदर बाजार) पोलीस ठाण्यात ६, विजापूर रोड पोलीस ठाण्यात १६ आणि जेल रोड पोलीस ठाण्यात १९ सिलिंडर जप्त झाले.
रात्री उशिरापर्यंत संबंधित पोलीस ठाण्यांत व्यावसायिकांविरुद्ध **Essential Commodities Act** अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पथकात परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे (ब विभाग), नंदकिशोर डोके (अ विभाग), प्रफुल नाईक (ड विभाग), पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर काशीद, सज्जन भोसले, वैभव मोरे, सचिन लांडे, आनंद मधणे तसेच पोलीस अंमलदार जावेद जमादार, आबाजी सावळे, धीरज सातपुते, विठ्ठल यलमार आदी सहभागी होते.
जिल्ह्यातील व्यावसायिक गॅसचा तुटवडा आणि घरगुती सिलिंडरचा अवैध वापर वाढल्याने सामान्य नागरिकांना सिलिंडर मिळण्यास अडचणी येत आहेत. प्रशासनाने सांगितले की, जिल्हाभरात विशेष पथके कार्यरत असून, प्रत्येक तालुक्यात नियमित तपासणी सुरू आहे. पंढरपूरसारख्या ठिकाणीही अशाच कारवाया झाल्या असून, अवैध वापर रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, घरगुती गॅस फक्त घरगुती स्वयंपाकासाठी वापरा आणि व्यावसायिक वापर किंवा काळाबाजाराबाबत माहिती असल्यास तात्काळ पुरवठा विभाग किंवा पोलीसांकडे तक्रार करा.
टिप्पण्या