**उन्हाळ्यातही मुक्या प्राण्यांची तहान भागवणारी 'जलसेवा'; भैरवनाथ चौधरी यांचा ३ वर्षांचा स्तुत्य उपक्रम**

**उन्हाळ्यातही मुक्या प्राण्यांची तहान भागवणारी 'जलसेवा'; भैरवनाथ चौधरी यांचा ३ वर्षांचा स्तुत्य उपक्रम** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** उन्हाळ्याच्या तापलेल्या वातावरणात पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागते. अशा काळात केवळ माणसांनाच नव्हे, तर मुक्या प्राण्यांनाही स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ही सामाजिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून गुळपोळी (ता. बार्शी) येथील पत्रकार भैरवनाथ चौधरी यांनी गेल्या तीन वर्षांपासून सलग ३६ महिने पशूंसाठी जलसेवा सुरू ठेवली आहे.

कोणत्याही ऋतूचा विचार न करता ते परिसरातील गायी, म्हशी, बैल, शेळ्या-मेंढरांसाठी विशेष हौद भरून ठेवतात. केवळ पाणी भरून थांबत नाहीत, तर प्रत्येक तीन-चार दिवसांनी हा हौद स्वतः स्वच्छ करतात. ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या काळात ही सेवा पशुपालकांसाठी मोठा आधार ठरली आहे.

भैरवनाथ चौधरी ‘महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थे’चे माध्यमातून केवळ प्राणीसेवा करत नाहीत. संस्थेमार्फत समाजाच्या सर्व घटकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यात महिलांसाठी आरोग्य शिबिरे, कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्र वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आजी-माजी सैनिकांचा सत्कार, स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव, आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान, अनाथालयांना अन्नधान्य पुरवठा, महापुरासारख्या आपत्तीत मदत, १२५ जणांना मोफत आधार कार्ड बनवून देणे आणि पोस्टाच्या विविध योजनांची तळागाळापर्यंत जनजागृती यांचा समावेश आहे.

“मुक्या प्राण्यांची तहान भागवणे हे परमेश्वर सेवेसारखेच आहे. हीच खरी समाजसेवा. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे,” असे भैरवनाथ चौधरी यांनी सांगितले.

निसर्ग संतुलन आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे भैरवनाथ चौधरी आणि महामानव संस्थेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**