**बार्शी : कोयत्याने हल्ला, जेसीबी चालक जखमी; आरोपीच्या आईने टपरीतून शस्त्र पुरवले**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : गुरुवारी रात्री ९.३० वाजता बार्शी शहरातील मंगळवार पेठ, गणेश तलाव रोडवर पान टपरीसमोर एका जेसीबी चालकावर हल्ला झाला. आरोपी ईश्वर रसाळ याने शिवीगाळ करून विटेचा तुकडा, लाथाबुक्के आणि नंतर कोयता घेऊन मारहाण केली. त्याच्या आईने पान टपरीतून कोयता आणून दिला. या हल्ल्यात जखमीच्या उजव्या हाताच्या दंडावर आणि भुवईच्या वर कपाळावर गंभीर जखमा झाल्या. आरोपीच्या वडिलांनीही दगड फेकून जीवितास धोका निर्माण केला.
जेसीबी चालक विनोद प्रकाश रणदिवे (२४, राहणार वैद्य वस्ती, परांडा रोड, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तो आपल्या आत्या-मुलगा गणेश चंद्रकांत गायकवाड यांच्यासोबत मोटारसायकलवर सासुरवाडीला जात होता. त्यावेळी ईश्वर रसाळ याने अचानक शिवीगाळ करून विटेचा तुकडा घेऊन धाव घेतली. प्रतिकार करताना विटा खाली पडल्यावर त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याची आई (नाव अज्ञात) तेथे आली आणि त्याने तिला पान टपरीतून कोयता आणण्यास सांगितले. आईने कोयता आणून दिला. ईश्वरने प्रथम उलट्या बाजूने कोयत्याने विनोदच्या उजव्या हाताच्या दंडावर वार केला, नंतर भुवईच्या वर कपाळावर वार करून जखमी केले.
हल्ल्यानंतर आरोपी, त्याची आई आणि वडील (नावे अज्ञात) यांनी मंगळवार पेठेकडे पळ काढताना दगड फेकले. त्यावेळी रस्त्याकडेच्या झोपलेल्या नागरिकांना दगड लागण्याचा धोका निर्माण झाला. आरोपी तिघे पळून गेल्यानंतर अंकुश करपे, विकास सावंत, विक्रम सदाफुले आणि रणजीत जाधव यांनी मदत केली. गणेश गायकवाड यांनी विनोदला बार्शी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. विनोद सध्या शुद्धीत आहे.
बार्शी शहर पोलीस ठाण्यात FIR क्र. ०१९६/२०२६ नोंदवण्यात आली आहे. शस्त्र अधिनियम १९५९ कलम २५ आणि ४ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), ११८(१), १२५, ३(५) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी ईश्वर रसाळ आणि त्याच्या आई-वडिलांविरुद्ध तपास सुरू केला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या