**सोलापूर : जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलवरील सर्व निर्बंध हटवले!**
**सोलापूर : जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलवरील सर्व निर्बंध हटवले!**
**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर**सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठा निर्णय घेतला आहे. २० मार्च २०२६ रोजी जारी केलेला जुना आदेश रद्द करून पेट्रोल-डिझेल कॅन, ड्रम किंवा बाटलीमध्ये देण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
२० मार्चच्या आदेशानुसार सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पेट्रोल-डिझेल उघड्या कंटेनरमध्ये विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली होती. स्प्रेयर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, डिझेल जनरेटरसारख्या शेतीयंत्रांसाठी शेतकऱ्यांना कॅन-ड्रममध्येच डिझेल घेऊन जावे लागते. यामुळे १०-१५ किलोमीटर दूर पेट्रोल पंपांवर यंत्रे नेऊन-आणून वेळ आणि खर्च वाढत होता.
शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत जुना आदेश रद्द केला. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी यापूर्वीच सांगितले होते की, जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरेसा साठा आहे. कोणताही तुटवडा भासणार नाही, असे आश्वासन दिले होते. नियमित पुरवठा सुरळीत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे शेतकरी, वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यात इंधन वितरण पूर्ववत सुरळीत सुरू राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या