**सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदांची बिनविरोध निवड**
**सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदांची बिनविरोध निवड**
**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, २७ मार्च २०२६** : भारतीय जनता पक्षाने आज सोलापूर जिल्हा परिषदेच्या पाच विषय समित्यांच्या सभापतीपदांची नावे जाहीर केली. या सर्व पदांसाठी बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्याकडे अर्थ व बांधकाम समितीचे सभापतीपद, रामप्पा चिवड शेट्टी यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतीपद, चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापतीपद, संस्कृती सातपुते यांच्याकडे समाजकल्याण समितीचे सभापतीपद आणि ॲड. अमृता नागनाथ वाघे यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद सोपविण्यात आले आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार, माजी आमदार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ही नावे जाहीर केली. ही निवड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांप्रमाणे सव्वा वर्षे किंवा अडीच वर्षे अशी असेल, याबाबत अजून स्पष्टता नाही.
**निवडीचे राजकीय संतुलन**
जिल्हा परिषदेत भाजपला प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाल्याने (६८ पैकी ३८ जागा) ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. अर्थ व बांधकाम समितीचे सभापतीपद पारंपारिकपणे उपाध्यक्षांकडे जात असल्याने इंद्रजीत पवार (उत्तर सोलापूर) यांना हे पद मिळाले. रामप्पा चिवड शेट्टी दक्षिण सोलापूर (वळसंग) गटातून निवडून आले आहेत. संस्कृती सातपुते (माळशिरस, दहिगाव गट) माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी आहेत. ॲड. अमृता वाघे माढा तालुक्यातील टेंभुर्णी गटातून विजयी झाल्या आहेत. जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनाही शिक्षण व आरोग्य समितीची जबाबदारी देण्यात आली.
या निवडीमुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघात अध्यक्षपद, सोलापूरमध्ये उपाध्यक्षपद आणि माढा लोकसभा मतदारसंघात तीन प्रमुख समित्यांचे सभापतीपद असे संतुलन साधले गेले आहे. सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड आज झाली.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या