**नाशिकच्या स्वघोषित ज्योतिष कॅप्टन अशोक खरात प्रकरणात शिर्डी कनेक्शन उघड; ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त, एसआयटीकडून सखोल तपास**
**नाशिकच्या स्वघोषित ज्योतिष कॅप्टन अशोक खरात प्रकरणात शिर्डी कनेक्शन उघड; ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त, एसआयटीकडून सखोल तपास**
**KDM NEWS प्रतिनिधी शिर्डी/नाशिक (महाराष्ट्र) - नाशिक क्राईम ब्रँचने अटक केलेल्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या प्रकरणात शिर्डी पोलिसांच्या प्राथमिक तपासामुळे मोठे धागेदोरे उघड झाले आहेत. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिर्डीतील एका प्रतिष्ठित कुटुंबातील २४ वर्षीय तरुणीने खरातच्या कार्यालयातील कर्मचारी नीरज जाधवविरुद्ध आक्षेपार्ह मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करण्याचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीमुळे खरातच्या शिर्डीतील मालमत्ता, संबंध आणि अनेक महिलांशी संबंधित ५८ व्हिडिओ समोर आले आहेत.
शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. १३१/२०२६ नोंदवला गेला. त्यात कलम ३५१(२), भारतीय न्याय संहिता ६६(३), ६७(अ) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदी लागू करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपअधीक्षक अमोल भारती आणि निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. आरोपी नीरज जाधवला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या पेन ड्राईव्ह तपासात खरातच्या कॅनडा कॉर्नर कार्यालयातील ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले. या व्हिडिओमध्ये विविध महिलांचा समावेश असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
नाशिक क्राईम ब्रँचने खरातला मंगळवारी मध्यरात्री अटक केली. त्याला २४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तपासात खरातच्या घरातून पिस्तूल, काडतुसे आणि ६.५ लाख रोख जप्त करण्यात आले. मुख्य प्रकरणात एका ३५ वर्षीय महिलेवर तीन वर्षांपासून सतत अत्याचार केल्याचा आरोप आहे. खरातने धार्मिक विधी, भय आणि ब्लॅकमेलिंगचा वापर करून पीडितांना फसवल्याचे तपासात समोर आले आहे.
शिर्डी कनेक्शन अधिक गंभीर: खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे शिर्डीतील पानमळा येथे ३० गुंठे, निमगाव येथे सव्वा एकर आणि निघोज येथे ४ एकर (अंदाजे ५० कोटी मूल्य) जमीन आहे. एकूण सुमारे ६ एकर प्राईम जमीन (६०-७० कोटी मूल्य) शिर्डी-कोपरगाव-सिन्नर भागात असल्याचे उघड झाले. अटकेआधी शिर्डीतील शेतातील गहू घाईने कापून हलवण्यात आल्याने पुरावे नष्ट करण्याचा संशय व्यक्त होत आहे. खरात सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशानेश्वर महादेव ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि शिर्डीत त्याचे वारंवार येणे-जाणे होते.
राज्य सरकारने या सर्व प्रकरणाचे तपासासाठी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. खरातकडूनच ३ कोटींची खंडणी मागितल्याचा डिसेंबर २०२५ चा सिन्नर गुन्हाही जोडला जात आहे. यापूर्वी पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी खरातविरोधात बातमी दिल्यावर महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी नोटीस पाठवल्याचेही समोर आले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर पोलिसांच्या तत्परतेला दाद दिली. पुढील वर्षी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे धागेदोरे तपासण्यात येत आहेत. पोलिसांनी खरातच्या बँक खात्यांचा, मालमत्तेचा आणि संबंधित व्यक्तींचा सविस्तर आढावा घेतला असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या