**‘इथे थांबणे नाही’ सुधारित आवृत्ती व ‘वाट रेखाटणारी पावलं – Grounded Glory’ चे भव्य प्रकाशन**

**‘इथे थांबणे नाही’ सुधारित आवृत्ती व ‘वाट रेखाटणारी पावलं – Grounded Glory’ चे भव्य प्रकाशन** 


**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :  बार्शीतील शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात रविवार, २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आयएएस अधिकारी रमेश घोलप यांच्या दोन प्रेरक पुस्तकांचे भव्य प्रकाशन होणार आहे. 

‘इथे थांबणे नाही’ या आत्मकथनाच्या सुधारित आवृत्तीचे आणि उमेद प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वाट रेखाटणारी पावलं – Grounded Glory’ या मराठी-इंग्रजी द्विभाषिक कॉफी टेबल बुकचे एकाच सोहळ्यात प्रकाशन होईल. 

रमेश घोलप यांचा जीवनप्रवास लाटांना न जुमानता ध्येयाकडे सतत वाटचाल करण्याचा, निश्चय काळजावर कोरल्यावर यश आपोआप येण्याचा आणि जिद्द-चिकाटीची प्रचिती देणारा वस्तुपाठ आहे. रमेश यांनी जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतले. कोचिंगशिवाय २०१२ मध्ये यूपीएससी परीक्षेत २८७ वी रँक मिळवून आयएएस झाले. त्या वर्षीच एमपीएससीमध्येही राज्यात पहिला क्रमांक पटकावला. ‘इथे थांबणे नाही’ या पुस्तकात त्यांच्या संघर्ष, निश्चय आणि यशाची पूर्ण कहाणी आहे. 

दुसरे पुस्तक ‘वाट रेखाटणारी पावलं – Grounded Glory’ हे छायाचित्रांसहित कॉफी टेबल बुक असून, त्यात रमेश घोलप यांच्या प्रशासकीय सेवेतील सामाजिक कार्य, सेवा आणि प्रेरणादायी क्षणांचे चित्रण आहे. दोन्ही पुस्तके तरुण पिढीला संघर्षातून यशाकडे जाण्यासाठी दिशादर्शक ठरतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे सदस्य आणि माजी एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी (निवृत्त आयपीएस, माजी एडीजी, एनआयए दिल्ली) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता व कवी नागराज मंजुळे आणि बी.व्ही.जी. ग्रुपचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड यांच्या शुभहस्ते पुस्तकांचे प्रकाशन होईल. 

कार्यक्रमाला खासदार ओमराजे निंबाळकर (धाराशिव), आमदार दिलीप सोपल (बार्शी), माजी आमदार राजेंद्र राऊत, बार्शी नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले, प्रकाशक मनोज अंबिके (माय मिरर पब्लिकेशन), डॉ. बी. वाय. यादव (अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी) आणि ज्येष्ठ विचारवंत व कामगार नेते तानाजी ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

ग्राफिक्स कर्व्ह आणि सचिन ऑफसेट, बार्शी यांनी प्रकाशनासाठी सहकार्य केले आहे. 

उमेद प्रतिष्ठान आणि पुस्तक प्रकाशन सोहळा समितीने बार्शी व परिसरातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरक सोहळ्याला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम केवळ पुस्तक प्रकाशन नसून, एका संघर्षशील जीवनाचा सन्मान असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

या निमित्ताने आयोजित बैठकीत डॉ. बी. वाय. यादव, धीरज मांजरे, अमोल ताकभाते, उमेश घोलप, प्राचार्य डॉ. दीपक गुंड, रामचंद्र इकारे, बाळासाहेब ढेंबरे, विशाल गायकवाड, अनिकेत माने, गणेश घोलप, खंडू डोईफोडे, अविनाश बोकेफोडे, विशाल घोलप, प्रमोद कानगुडे, संदीप गायकवाड आदी समिती सदस्य उपस्थित होते.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल