**श्रीपतपिंपरीत पारधी महिलेवर दगडाने डोके फोडले, लाथाबुक्क्या व चावल्यानं जखमी; जुन्या भांडणातून सोन्या पाटीलवर SC/ST अत्याचार कायद्यानुसार गुन्हा**
**श्रीपतपिंपरीत पारधी महिलेवर दगडाने डोके फोडले, लाथाबुक्क्या व चावल्यानं जखमी; जुन्या भांडणातून सोन्या पाटीलवर SC/ST अत्याचार कायद्यानुसार गुन्हा**
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : २३ मार्च २०२६ बार्शी तालुक्यातील श्रीपतपिंपरी, इंदिरानगर येथील विजय किराणा स्टोअर्स चालवणाऱ्या रजना पंप्पु पवार (वय ३९, हिंदू पारधी) यांच्यावर २१ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता दुकानासमोरच सोन्या उर्फ रणजीत बाळासाहेब पाटील याने दगडाने डोके फोडून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आणि डाव्या पोटरीला चावून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. त्यानंतर "परत नादी लागलात तर जिवे मारीन" अशी जीवघेणी धमकी देऊन आरोपी पळून गेला.
रजना पवार यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितले की, त्यांचा पती पंप्पु व दीर अनिल शेळ्या चारण्यासाठी बाहेर गेले होते. त्या एकट्या दुकानात बसल्या असताना गावातीलच बाळासाहेब अनंतराव पाटील यांचा मुलगा सोन्या पाटील दुकानासमोर आला. "तुम्ही माझ्या वडिलांसोबत का भांडलात?" म्हणून शिवीगाळ सुरू केली. रजना समजावून सांगण्यासाठी बाहेर आल्या, तेव्हा आरोपी खडीच्या ढिगाऱ्यातून दगड उचलून त्यांचा डोके फोडला. त्यानंतर हाताने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि डाव्या पोटरीला चावले.
मागील एक महिन्यापूर्वी जामगाव (ता. माढा) शिवारात बाळासाहेब पाटील यांच्याशी झालेल्या भांडणाची पार्श्वभूमी असल्याचे रजना यांनी सांगितले. ते भांडण माढा पोलिसांत मिटले होते, त्यावेळी तक्रार दिली नव्हती.
रजना यांनी तत्काळ पतीला फोन करून बोलावले. दोघे पोलीस ठाणे गेले. पोलिसांनी सरकारी दवाखान्याचे रेफरल दिले. उपचार घेतल्यानंतर मनःस्थिती बिघडल्याने त्या दिवशी तक्रार न देता घरी परतल्या. आज २२ मार्च रोजी पती व नातेवाईकांसोबत पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली.
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात FIR क्र. ००८२/२०२६ नोंद झाली आहे. अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कलम ३(१)(१), ३(१)(८), ३(२)(वा) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
रजना पवार यांचे कुटुंब शेळीपालन, मोलमजुरी व किराणा दुकानावर उदरनिर्वाह करत असून, इंदिरानगरमध्ये कायमस्वरूपी राहतात. आरोपी सोन्या पाटील हा श्रीपतपिंपरी येथीलच रहिवासी आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या