**पंढरपूर हादरलं : भेळ खाण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर रस्त्यात ॲसिड हल्ला, दोघा हल्लेखोरांनी काही क्षणांत फरार**
**पंढरपूर हादरलं : भेळ खाण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर रस्त्यात ॲसिड हल्ला, दोघा हल्लेखोरांनी काही क्षणांत फरार**
**KDM NEWS प्रतिनिधी पंढरपूर ** पंढरपूर (सोलापूर) :** शहराच्या गजबजलेल्या मध्यवस्तीत रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका २१ वर्षीय तरुणीवर ॲसिडसदृश द्रव्य फेकण्याची धक्कादायक घटना घडली. भेळ खाण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणीच्या चेहऱ्यावर आणि तोंडावर हल्ला झाल्याने ती गंभीर जखमी झाली. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते आणि घटनास्थळावरून काही क्षणांत फरार झाले. या घटनेने संपूर्ण पंढरपूर शहरात खळबळ उडाली असून जिल्हाभरात मोठी चर्चा सुरू आहे.
घटना शहरातील बोहरी पेट्रोल पंपाजवळील मध्यवर्ती रस्त्यावर घडली. पीडित तरुणी रस्त्यावरून चालत असताना अज्ञात तरुणांच्या टोळक्याने तिला गाठले. काही कळायच्या आत दोघा तरुणांनी तिच्या चेहऱ्यावर ॲसिडसदृश द्रव्य फेकले. लगेच चेहऱ्याला तीव्र जळजळ आणि वेदना सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जाते. मात्र चेहऱ्यावर गंभीर इजा झाल्याने तिच्यावर सतत देखरेख ठेवण्यात येत आहे.
पीडितेच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. सध्या आरोपींना अटक झालेली नाही.
ही घटना शहराच्या मुख्य भागात घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपूर पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला असल्याचे सांगितले. अधिक माहिती मिळाल्यानंतर तपासात नवीन मुद्दे समोर येण्याची शक्यता आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या