**प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाच्या बाहेर आरोग्य मित्रांचे नाव, संपर्क क्रमांक व टोल फ्री तक्रार नंबर असलेला डिस्प्ले बोर्ड लावणे अनिवार्य**
**प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाच्या बाहेर आरोग्य मित्रांचे नाव, संपर्क क्रमांक व टोल फ्री तक्रार नंबर असलेला डिस्प्ले बोर्ड लावणे अनिवार्य**
**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** जिल्ह्यातील १७ धर्मादाय रुग्णालयांमधील गरजू, गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. यासोबतच प्रत्येक रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आरोग्य मित्र (आरोग्य सेवक) यांचे नाव, संपर्क क्रमांक, टोल फ्री क्रमांक व तक्रार निवारण क्रमांक असलेला डिस्प्ले बोर्ड १५ दिवसांत लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नियोजन भवन सभागृहात झालेल्या धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समितीच्या त्रैमासिक आढावा बैठकीत धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ, धर्मादाय निरीक्षक उमेश देशमुख, भागवत फुलसुंदर, समिती सदस्य व सर्व रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. सूर्यवंशी म्हणाले, “राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व १७ रुग्णालयांनी गोरगरीब रुग्णांना उपचारासोबत पूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. रुग्णालयांना मान्यता देण्यामागील हेतूची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. शासकीय जागेचा वापर केवळ वैद्यकीय सेवेसाठीच व्हावा, कोणत्याही व्यावसायिक कामासाठी नाही याची काळजी घ्या.”
रुग्णालयांनी आपल्या आरोग्य सेवकांना योग्य प्रशिक्षण द्यावे, असेही त्यांनी सांगितले. शासनाने नियुक्त केलेल्या पाच आरोग्य सेवकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले असले तरी प्रत्येक रुग्णालयाने त्यांना फील्डवरील प्रत्यक्ष प्रशिक्षण द्यावे. आरोग्य सेवक व रुग्णालय यांच्यात चांगला समन्वय असावा. गरजू रुग्णांना उपचार प्रक्रिया, योजनेचे फायदे व सर्व माहिती स्पष्ट करावी. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे क्लेम ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रांसह तयार करून द्यावेत. योजनेंतर्गत कोणत्याही रुग्णाकडून अतिरिक्त पैसे घेतले जाणार नाहीत, याची जबाबदारी रुग्णालयांवर आहे.
**बाहेर डिस्प्ले बोर्ड अनिवार्य**
प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाच्या दर्शनी भागात आरोग्य मित्रांचे नाव, मोबाईल क्रमांक, टोल फ्री क्रमांक व तक्रार निवारण क्रमांक असलेला स्पष्ट डिस्प्ले बोर्ड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना तात्काळ मदत मिळेल आणि तक्रारींची नोंदही सहज होईल. महसूल यंत्रणेने पुढील १५ दिवसांत सर्व रुग्णालयांमध्ये हे बोर्ड लावल्याची खात्री करावी, असे निर्देश उप आयुक्तांनी दिले.
**तपासणी पथकाची नियुक्ती**
निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी सांगितले की, सर्व रुग्णालयांमध्ये शासन निर्देशानुसार आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पथक नेमण्यात येईल. या पथकात तहसीलदार व आरोग्य अधिकारी यांचा समावेश असेल. पथक एक महिन्यात अहवाल सादर करेल.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या