**बार्शीत गोमांस वाहतूक प्रकरण उघड; दोन जणांना अटक, १७५ किलो मांसासह वाहने जप्त**
**बार्शीत गोमांस वाहतूक प्रकरण उघड; दोन जणांना अटक, १७५ किलो मांसासह वाहने जप्त**
**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** बार्शी शहर पोलिसांनी डायल ११२ वर मिळालेल्या नागरिकांच्या टिपण्णीवरून मोठी कारवाई करत गोवंशीय जनावरांच्या मांसाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात सुमारे १७५ किलो मांस (अंदाजे ३५ हजार रुपयांचे) आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
पोलिस शिपाई शरद दत्तू साळवी यांच्या डायल ११२ ड्यूटीदरम्यान २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सात वाजून चार मिनिटांनी एका नागरिकाने फोन करून माणकेश्वर (ता. भूम, जि. धाराशिव) येथून बार्शीकडे गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ हालचाल करत संशयित मार्गावर सतर्कता बाळगली.
यावेळी एमएच ०९ ईएल ०८६३ क्रमांकाची ऑटो रिक्षा आणि एमएच १३ बीवाय ८५४० क्रमांकाची मोटारसायकल अडवण्यात आली. वाहनांची तपासणी केल्यावर त्यात पांढऱ्या पिशव्यांमध्ये भरलेले गोवंशीय जनावरांचे कापलेले मांस सापडले. एकूण १७५ किलो मांस जप्त करण्यात आले. ऑटो रिक्षा आणि मोटारसायकल मिळून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला.
पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मांसाचे नमुने घेऊन ते सीलबंद करून रासायनिक परीक्षणासाठी पाठवण्यात येणार आहेत.
या प्रकरणी बार्शीतील मंगळवार पेठेत राहणारे जमील निसार सौदागर (वय ४५) आणि फैज वाहब सौदागर (वय २३) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(ब), ५(क), ९, ९(अ) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई डायल ११२ सेवेच्या प्रभावी वापरामुळे शक्य झाली. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या