**बार्शीत इंदापूरच्या १८ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; एम.आय.टी. कॉलेज हॉस्टेलमधील घटना**

**बार्शीत इंदापूरच्या १८ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; एम.आय.टी. कॉलेज हॉस्टेलमधील घटना** 
**KDM NEWS बार्शी: (प्रतिनिधी)**बार्शी तालुक्यातील जामगाव शिवार येथील एम.आय.टी. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
    
   मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी सतीश पाटील रा. वडाळवाडी भिगवण, ता. इंदापूर, ही विद्यार्थिनी एम.आय.टी. कॉलेजच्या हॉस्टेलमधील ब्लॉक नं. ४०१, रूम नं. ६९ मध्ये राहत होती. रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:१९ ते रात्री ८:१५ च्या सुमारास तिने आपल्या खोलीत फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला.
         ओरडण्याचा आवाज अन् थरार...
कॉलेजच्या स्टोअर डिपार्टमेंटमधील कर्मचारी अमित अशोक छपरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रात्री सव्वा आठच्या सुमारास हॉस्टेलमध्ये मुलींच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. वैभवीच्या खोलीचा दरवाजा आणि खिडक्या आतून बंद होत्या. खिडकीतून डोकावून पाहिले असता तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. यानंतर तातडीने बार्शी तालुका पोलिसांना पाचारण करण्यात आले.
             
याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू  अन्वये 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३' च्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी स.पो.नि. ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बोबडे करत आहेत. ऐन तारुण्यात विद्यार्थिनीने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल