**सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन; कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी बदली**

**सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन; कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी बदली** 

**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर - महाराष्ट्र शासनाने बुधवारी सायंकाळी पाच वाजता पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. यात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम (आयएएस २०२०) यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गडचिरोली येथील सहाय्यक जिल्हाधिकारी व आयटीडीपी अहेरीचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन (आयएएस २०२२) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, राज्यातील प्रशासकीय फेरबदलांच्या मालिकेत हा तिसरा मोठा बदल आहे.

कुलदीप जंगम यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत सुमारे दीड वर्षाच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी केली. अनुकंपा भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे राबवून त्यांनी जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवला. शासनाच्या ‘१५० दिवस सेवाकर्मी’ कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर राहिली. या यशस्वी कामगिरीबद्दल मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट कार्यालय प्रमुख’ पुरस्काराने जंगम यांचा सन्मान करण्यात आला होता. शांत स्वभावाचे आणि कर्मचाऱ्यांमध्ये आदराचे स्थान असलेले अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

नवनि नियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन हे २०२१ च्या यूपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतात ४० व्या क्रमांकाचे (एआयआर ४०) उमेदवार आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील मूळ रहिवासी असलेल्या जैन यांनी माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयात अभियांत्रिकी पदवी घेतली. आयएएस होण्यापूर्वी त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम केले होते. २०२२ च्या आयएएस बॅचचे ते अधिकारी असून, सुरुवातीला आंध्र प्रदेश कॅडर मिळाल्यानंतर नंतर महाराष्ट्र कॅडरमध्ये बदली झाली. सध्या ते गडचिरोलीत सहाय्यक जिल्हाधिकारी व आयटीडीपी अहेरीचे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

या बदल्यांमुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनात नवीन ऊर्जा येईल, अशी अपेक्षा जिल्हावासीय व्यक्त करत आहेत. जंगम यांच्या कार्यकाळातील पारदर्शकता व कार्यक्षमता यांचा वारसा कुशल जैन कसा पुढे नेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल