**घरी बायकोला काय तोंड दाखवू? तिला काय उत्तर देऊ?' सिलिंडर मिळत नसल्यानं नवऱ्याचा संयम सुटला; एजन्सीसमोरच डोकं फोडून घेतलं**

**छत्रपती संभाजीनगर : 'घरी बायकोला काय तोंड दाखवू? तिला काय उत्तर देऊ?' सिलिंडर मिळत नसल्यानं नवऱ्याचा संयम सुटला; एजन्सीसमोरच डोकं फोडून घेतलं** 

**KDM NEWS प्रतिनिधी रांजणगाव (छत्रपती संभाजीनगर) :** घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईने सामान्य माणूस किती हतबल होऊ शकतो, याचा थरारक अनुभव वाळूज परिसरातील रांजणगाव शेपू येथे समोर आला. कमल गॅस एजन्सीसमोर ५० वर्षीय बालचंद नेमाने यांनी संतापाच्या भरात स्वतःचे डोके फोडून घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली.

मागील काही दिवसांपासून बालचंद नेमाने (रा. रांजणगाव) घरगुती सिलिंडरसाठी कमल गॅस एजन्सीचे उंबरठे झिजवत होते. वारंवार चकरा मारूनही सिलिंडर मिळत नव्हता. गुरुवारी दुपारी ते पुन्हा एजन्सीवर गेले. तेथे सिलिंडर उपलब्ध नसल्याचे सांगितल्यावर त्यांचा संयम सुटला. 'किती दिवस चकरा मारायच्या? हक्काचा गॅस मिळत नसेल तर घरी जाऊन बायकोला काय उत्तर देऊ?' असा सवाल करत त्यांनी एजन्सी आवारातच स्वतःला दुखापत करून घेतली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नेमाने यांना पाहून उपस्थित लोकांनी धावपळ केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.

वाळूज-रांजणगाव औद्योगिक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलिंडरचा पुरवठा अनियमित असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तासनतास रांगेत उभे राहूनही ग्राहक रिकाम्या हाताने परतत असल्याने संताप वाढला आहे. आजची ही घटना गॅस वितरणातील कारभाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधणारी ठरली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल