**बसस्थानकांवर 'नाथजल'ची एक लिटर बाटली केवळ १५ रुपयांनाच विक्री; जादा दर आकारल्यास परवाना रद्द**
**बसस्थानकांवर 'नाथजल'ची एक लिटर बाटली केवळ १५ रुपयांनाच विक्री; जादा दर आकारल्यास परवाना रद्द**
**KDM NEWS प्रतिनिधी पुणे :** प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कडक भूमिका घेतली आहे. एसटी बसस्थानकांवर 'नाथजल'ची एक लिटरची बाटली केवळ १५ रुपयांनाच विक्री करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत. यापेक्षा जास्त दर आकारल्यास संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी सरनाईक यांनी लोणावळा बसस्थानकाची अनपेक्षित पाहणी केली. यावेळी प्रवाशांशी बोलताना 'नाथजल'च्या बाटलीला २० रुपये आकारले जात असल्याची तक्रार समोर आली. यावर मंत्री सरनाईक यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत विक्रेत्याला दरफलक स्पष्टपणे लावण्याच्या सूचना दिल्या आणि भविष्यात असे प्रकार घडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.
प्रवाशांनी यावेळी आणखी एक समस्या उपस्थित केली. काही बसेस लोणावळा बसस्थानकावर थांबत नसल्याचे आणि जाणीवपूर्वक खाजगी हॉटेलांवर थांबवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे प्रवाशांना महागडे नाश्ता आणि खाद्यपदार्थ घ्यावे लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते. यावर सरनाईक यांनी सर्व नियोजित बसेस लोणावळा बसस्थानकावरच थांबवण्याचे आणि खाजगी हॉटेलांवर थांबवण्यास पूर्ण बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.
पाहणीदरम्यान सरनाईक यांनी बसस्थानकातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालये, तिकीट व्यवस्था आदी सुविधांची सखोल तपासणी केली. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उन्हाळ्यात प्रवाशांना परवडणाऱ्या दरात पाणी मिळणे ही मूलभूत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे आदेश राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवर लागू असतील, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या