**आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी पंढरपूरातील विविध ठिकाणांची पाहणी**

**आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी पंढरपूरातील विविध ठिकाणांची पाहणी** 

**KDM NEWS प्रतिनिधी पंढरपूर (दि. १५ एप्रिल २०२६):** आषाढी शुद्ध एकादशी सोहळा यंदा २५ जुलै २०२६ रोजी साजरा होणार असून, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांसह अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक पंढरपूरला येणार आहेत. या सोहळ्यात भाविकांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध व्हाव्यात, गर्दी व्यवस्थापन सुरळीत व्हावे आणि पायाभूत सुविधा सक्षम व्हाव्यात, यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज वाखरी पालखी तळ, भक्ती सागर (६५ एकर), दर्शन रांग, दर्शन मंडप, नदीपात्र, स्काय वॉक, चंद्रभागा वाळवंट, ज्ञानेश्वर दर्शन मंडप, विसावा मंदिर आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची सविस्तर पाहणी केली.

पाहणीवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वाखरी पालखी तळावर पालखी सोहळा आणि वारकऱ्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. पिण्याचे पाणी, पाणीपुरवठा, स्वच्छता, आपत्कालीन कक्ष, विद्युत व्यवस्था, शौचालये आदी बाबींचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. भक्ती सागर येथेही भाविकांसाठीच्या सुविधांबाबत चर्चा झाली. गर्दी नियंत्रणासाठी वाखरी येथे वॉच टॉवर उभारण्यात यावेत, भक्ती सागरमध्ये हायमास्ट लाइट्सची संख्या वाढवावी आणि सर्व पायाभूत सुविधा भाविकांना सहज उपलब्ध व्हाव्यात, अशा महत्त्वाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

मंदिर समितीकडून दर्शन रांगेत विश्रांती कक्ष, जलद दर्शन व्यवस्था आणि प्रस्तावित दर्शन मंडप याबाबतची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती देऊन त्यांचीही पाहणी करण्यात आली.

यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सरडे, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रांताधिकारी सचिन इथापे आणि मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी वाखरी पालखी तळ, भक्ती सागर व नदीपात्र येथील प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी भाविकांच्या सोयीला प्राधान्य देत सर्व कामे मुदतीत आणि दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल