**मुंगशीत अवकाळीने केला थरकाप! ८ टन बेदाणा चिखलात, शेतकरी हवालदिल**

**मुंगशीत अवकाळीने केला थरकाप! ८ टन बेदाणा चिखलात, शेतकरी हवालदिल** 

**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी) : दि. १७ बार्शी तालुक्यातील मुंगशी व परिसरात गुरुवारी दुपारी अचानक आलेल्या तुफान वादळासह जोरदार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. कडक उन्हाळ्यात उन्हाळी द्राक्ष शेतीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी पडले.

मुंगशीसह दहिटणे, सासुरे, राळेरास, तडवळे, यावली, ढोराळे, इर्लेवाडी आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेली, तर शेतीमालाचे मोठे नुकसान झाले.

मुंगशी येथील शेतकरी अर्जून श्रीपती क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी जालींदर राऊत यांच्या बेदाणा शेडवर आपला द्राक्षाचा माल वाळवणीसाठी ठेवला होता. अचानक आलेल्या वादळाने शेडवरील शेडनेट व संरक्षक कागद उडवून लावला. त्यानंतर पडलेल्या जोरदार पावसाने शेड पूर्णपणे उघडा पडून अंदाजे ७ ते ८ टन बेदाणा पाण्यात भिजून चिखल झाला. या एका घटनेत शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

वर्षभर कष्टाने वाढवलेल्या द्राक्षबागेचा हा माल वाळवण्यासाठी औषधे, खते आणि मजुरीवर झालेला खर्च वाया गेला. अनेक शेतकरी आधीच कर्जबाजारी असताना हे अतिरिक्त संकट आले आहे. काही शेतकऱ्यांचा माल अजून झाडावर असूनही काहींनी शेडवर ठेवला होता; त्यामुळे नुकसान अधिक झाले.

परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून भरीव नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. अर्जून क्षीरसागर यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी सांगितले की, “वादळी पावसाने बेदाण्याचे मोठे नुकसान झाले. कर्ज फेडणे व पुढील हंगाम कसा सांभाळायचा, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.”

सद्य:स्थितीत शेतकरी उरलेला माल वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत. प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल