**काटेगावच्या आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर गैरहजर; हृदयविकाराने युवकाचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप**
**काटेगावच्या आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर गैरहजर; हृदयविकाराने युवकाचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. १४ : बार्शी तालुक्यातील काटेगाव येथील आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे एका ३८ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या निष्काळजी कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी काटेगाव येथील रमीज (राजू) उमर पटेल यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने आरोग्य उपकेंद्रात नेले, परंतु तेथे डॉक्टर उपलब्ध नव्हते. वेळेवर उपचार न मिळाल्याने युवकाचा मृत्यू झाला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टर उपस्थित असते तर रमीज पटेल यांचा जीव वाचला असता.
यापूर्वी काटेगाव ग्रामपंचायतीने आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांच्या सतत गैरहजेरीबाबत वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनाकडे अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असे ग्रामस्थांचे आरोप आहेत.
“सरकार आरोग्य सुविधांसाठी लाखो रुपये खर्च करते, पण डॉक्टरच गैरहजर असतील तर या सुविधांचा काय उपयोग?” असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी आरोग्य यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर काटेगावसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी संबंधित डॉक्टर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, वेळेत कारवाई न झाल्यास मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या