**बार्शीत थरार! चारित्र्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यात पत्नीची धारदार शस्त्राने केली निर्घृण हत्या**
**बार्शीत थरार! चारित्र्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यात पत्नीची धारदार शस्त्राने केली निर्घृण हत्या**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :**बार्शी शहरात आज एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या २६ वर्षीय पत्नीची भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना सोमवारी (२५ मे) सकाळी साडेदहाच्या सुमारास बार्शी-परांडा रोडवरील प्रवीण हॉटेलजवळ घडली. **धनश्री ऋषीकेश पाटील (वय २६, रा. बार्शी)** असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे बार्शी शहरासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मृत धनश्रीचे वडील जितेंद्र विश्वनाथ गायकवाड (रा. कासारवाडी, ता. बार्शी) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध फिर्याद दिली असून, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
**बचत गटाचे काम करून परततानाच गाठले**
मिळालेल्या माहितीनुसार, मृत धनश्री पाटील ही महिला बचत गटात काम करत होती. सोमवारी सकाळी ती बचत गटाचे काम आटोपून लक्ष्याचेवाडी येथून आपल्या जुपीटर स्कुटीवरून (क्र. MH13-FA-4016) बार्शीकडे परत येत होती. दरम्यान, बार्शी-परांडा रोडवरील प्रवीण हॉटेलजवळ दबा धरून बसलेला तिचा पती आरोपी **ऋषीकेश संभाजी पाटील (रा. गांधी स्टॉप, गाडेगाव रोड, बार्शी)** याने तिला रस्त्यात अडवले. काही समजण्याच्या आतच ऋषीकेशने आपल्या जवळील धारदार शस्त्राने धनश्रीच्या गळा, मान आणि पोटावर सपासप वार केले. या हल्ल्यात धनश्री गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
**'मधे येऊ नका' म्हणत प्रत्यक्षदर्शींना धमकावले!**
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी समीर बशीर वळसंगकर (रा. परांडा रोड, बार्शी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही भराडिया शेताजवळ काम करत असताना एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. आम्ही धावून गेलो असता, ऋषीकेश हा हातातील धारदार शस्त्राने धनश्रीवर वार करत होता. आम्ही वाचवण्यासाठी पुढे गेलो असता, **'मधे येऊ नका!'** असे ओरडत त्याने धमकावले. हल्ला केल्यानंतर आरोपी त्याच्या मोटारसायकलवरून बार्शी शहराच्या दिशेने वेगाने पळून गेला."
**प्रेमविवाहाचा झाला दुर्दैवी अंत; ६ वर्षांचा मुलगा पोरका**
धनश्री आणि ऋषीकेश यांचा सन २०१८ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना ६ वर्षांचा एक मुलगाही आहे. सुरुवातीचे काही दिवस नीट गेल्यानंतर, गेल्या वर्षभरापासून आरोपी ऋषीकेश हा दारूच्या आहारी गेला होता. तो सतत चारित्र्याच्या संशयावरून धनश्रीला मारहाण आणि शिवीगाळ करत असे.
**मागील महिन्यातही झाली होती तक्रार:**
धनश्रीच्या आईला कॅन्सर हा आजार असल्याने ती उपचारासाठी वारंवार माहेरी येत-जात होती. या कारणावरूनही ऋषीकेश तिच्याशी वाद घालत होता. या जाचाला कंटाळून ३० एप्रिल २०२६ रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्यात ऋषीकेशविरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र, त्याची प्रवृत्ती बदलली नाही आणि अखेर या वादाचा अंत एका निष्पाप महिलेच्या हत्येने झाला.
**पोलीस आरोपीच्या शोधात**
मृत धनश्री ही बचत गटात काम करून कुटुंबाला हातभार लावत होती, तर आरोपी ऋषीकेश हा बजाज फायनान्समध्ये कार्यरत होता. घटनेची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपी ऋषीकेश पाटील याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास बार्शी शहर पोलीस करत आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या