**धाराशिव : अधिक मासानिमित्त सासऱ्याकडून जावयाला सिंधी जातीची घोडी भेट**

**धाराशिव : अधिक मासानिमित्त सासऱ्याकडून जावयाला सिंधी जातीची घोडी भेट** 

**KDM NEWS प्रतिनिधी धाराशिव**धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथे अधिक मासाच्या धोंडे जेवणाच्या निमित्ताने एक अनोखी घटना घडली आहे. पारा (ता. वाशी) येथील विलास झांबरे यांनी आपल्या जावयाला सोने-चांदीऐवजी देखणी **सिंधी जातीची घोडी** भेट दिली आहे. या भेटीची चर्चा परिसरात जोरदार रंगली आहे.

जावई क्रांतिसिंह राऊत यांना सासर्‍यांनी फोनवर शेत उपयोगी साहित्याचे पार्सल आल्याचे सांगितले. घरी आल्यावर जावयाला आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यांच्यासमोर एक सुंदर सिंधी घोडी उभी होती. विलास झांबरे यांनी साळेगाव येथील व्यापाऱ्याकडून ही घोडी खरेदी केली.

**सिंधी घोडीचे वैशिष्ट्य** : ही प्रजाती प्रेमळ, विश्वासू आणि शांत स्वभावाची मानली जाते. घोडेस्वार खाली पडल्यास ती पुढे पळून जात नाही, तर जागेवरच थांबते. रेवाड चाल चालणारी आणि गुणसंपन्न अशी ही घोडी शेतकरी आणि घोड्यांच्या प्रेमींसाठी उपयुक्त आहे.

सासर्‍यांनी सांगितले की, मुलीचे लग्न लॉकडाऊनकाळात साधेपणाने झाले. अधिक मासात जावयाला काहीतरी वेगळे आणि स्मरणात राहील असे भेट द्यायचे होते. जावयाला घोड्यांची आवड लक्षात घेऊन ही अनोखी भेट दिली. महागाई आणि इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष चर्चिले जात आहे. 

ही घटना पारंपरिक धोंडे जेवणाच्या परंपरेला नवा रंग देणारी ठरली आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या