**बकरी ईद निमित्त जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक : निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांचे आदेश**
**बकरी ईद निमित्त जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक : निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांचे आदेश**
**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दिनांक २२:** बकरी ईद हा सण २७ मे २०२६ रोजी साजरा होत असून दि. २७ ते दि. २९ मे २०२६ या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांची खरेदी-विक्री होणार आहे. यासाठी ठिकठिकाणी बाजार भरविण्यात येणार असून जनावरांच्या वाहतुकीसाठी कायदेशीर प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बकरी ईद २०२६ निमित्त 'महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा १९७६' व 'महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा कायदा १९९५' च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत निवासी जिल्हाधिकारी श्री. पाटील मार्गदर्शन करत होते.
यावेळी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुऱ्हाण, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. अनिल तांबे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अत्तिक मुलानी, महापालिकेचे मंडई नियंत्रण अधिकारी तपन डंके, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. डी. ए. गिड्डे, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी हबीब भाई नदाफ, हाजी कुरेशी, इस्माईल पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले की, सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आलेल्या सूचना तसेच पशुसंवर्धन विभाग व महापालिकेच्या वतीने बकरी ईद निमित्त केलेल्या तयारीप्रमाणे परस्परात समन्वय ठेवून ईद शांततेत पार पडेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील. सर्व मुस्लिम धर्मीय सामाजिक संघटनांनी प्रशासनालाही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जनावरांची अवैध कत्तल व अवैध वाहतूक रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग, पर्यावरण विभाग व पशुसंवर्धन विभाग यांनी समन्वय साधून संयुक्त कार्यवाही करावी. ईद सणाच्या काळात मार्गदर्शक सूचना व शासन निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असून कायदा व स्वास्थ्य तपासणी बाबत राहणाऱ्या त्रुटींचे निराकरण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करणे गरजेचे आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
महापालिकेचे मंडई नियंत्रण अधिकारी श्री. डंके यांनी सांगितले की, बकरी ईद निमित्त लहान-मोठ्या जनावरांची कुर्बानी देण्यासाठी 'फॉरेस्ट मटन मार्केट' येथे आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली असून, महापालिकेतर्फे पाण्याचे टँकरही उपलब्ध करून देण्यात येतील.
जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. तांबे म्हणाले की, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) कायदा, १९९५ अंतर्गत गाय, वळू, बैल यांच्या कत्तलीस व वाहतुकीस पूर्ण बंदी आहे. जनावरांची वाहतूक करत असताना जनावरांची वाहतूक अधिनियम, २००१ मधील नियम क्र. १६ नुसार वाहतूक प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. प्राणी छळ प्रतिबंधक कायदा, १९६० व वाहतूक अधिनियम १९७८ मधील नियम ४७ नुसार जनावरांची स्वास्थ्य तपासणी करून न्यायालयीन प्रेषण आवश्यक आहे. ईद सणाच्या काळात वाहतूक करताना प्राणी छळ प्रतिबंधक कायदा, १९६० मधील नियमांचे तसेच पशुसंवर्धन व पर्यावरण विभागाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य श्री. बुऱ्हाण यांनी छोट्या बकऱ्यांना घरीच कुर्बानी देण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली. देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच हसीफ भाई नदाफ यांनी सोलापूर महापालिकेने मोठ्या जनावरांसाठी पुढील काळात त्वरित आधुनिक कत्तलखाना निर्माण करण्याची मागणी केली. तसेच इतर उपस्थित सदस्यांनी बकरी ईद सण शांततेत साजरा करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या