**बार्शी तालुक्यात खरीप हंगामासाठी खत, बियाणे व औषधांचा मुबलक साठा**
**बार्शी तालुक्यात खरीप हंगामासाठी खत, बियाणे व औषधांचा मुबलक साठा**
**बार्शी (सोलापूर) :** कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी येथे तालुक्यातील रासायनिक खत, बियाणे आणि कीटकनाशक विक्रेत्यांसोबत महत्वाची आढावा बैठक झाली. या बैठकीत खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी युरिया, डीएपी, बियाणे व कीटकनाशकांचा पुरेसा साठा ठेवून वेळेत पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, पंचायत समिती सभापती मीनाक्षी रोंगे, बाजार समिती सभापती विजय गरड, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी सहाय्यक, खत-बियाणे विक्रेते आणि शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत शेतकरी हिताला प्राधान्य देत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. बार्शी तालुक्यात कुठेही खत, बियाणे किंवा औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासन आणि विक्रेत्यांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.
**बोगस माल विक्रीवर कारवाई**
बैठकीत बोगस बियाणे, मुदतबाह्य औषधे आणि खतांसोबत जबरदस्तीने इतर माल विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक दुकानात MRP दर फलक लावणे आणि शेतकऱ्यांना GST सह पक्के बिल देणे बंधनकारक करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी संयुक्त भरारी पथकाद्वारे तालुक्यातील प्रत्येक खत-बियाणे दुकानाची आठवड्यातून एकदा तपासणी करण्याचे ठरले.
या बैठकीचा मुख्य उद्देश बळीराजाला खरीप हंगामात अडचणीशिवाय लागणारा पुरवठा सुनिश्चित करणे हा होता. शेतकऱ्यांच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले.
टिप्पण्या