**शेळ्या विकून पोराच्या नोकरीसाठी दिले पैसे; रेल्वे नोकरीच्या नावाखाली बार्शीत लाखो रुपयांची फसवणूक**

**शेळ्या विकून पोराच्या नोकरीसाठी दिले पैसे; रेल्वे नोकरीच्या नावाखाली बार्शीत लाखो रुपयांची फसवणूक**

**KDM NEWS  बार्शी (प्रतिनिधी) : रेल्वेत टीसी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बार्शी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांची ११ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष बाबू डेंगळे (वय ६२, रा. पानगाव, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरेंद्र व्ही. कुलकर्णी (झरेगांवकर, रा. ढगे मळा, बार्शी) याने जानेवारी २०२५ मध्ये डेंगळे यांच्या सिव्हील डिप्लोमा झालेल्या मुलाला रेल्वेत टीसीची नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला १० लाख रुपये मागणी करण्यात आली होती. नंतर ८ लाख रुपयांत तडजोड झाली.

कुलकर्णीने ५ एप्रिल २०२५ पर्यंत नोकरीची ऑर्डर काढून देण्याचे सांगत ४ लाख रुपये अॅडव्हान्स मागितले. मुलाच्या भविष्यासाठी डेंगळे यांनी शेळ्या विकून आणि उसनवारी करून २० मार्चपर्यंत ४ लाख रुपये रोख स्वरूपात दिले.

नंतर कुलकर्णीने डेंगळे यांना संकेत खंडेराव पायगुडे (रा. पुणे) यांच्याकडे पाठवले. पायगुडेने रेल्वेत आणखी जागा उपलब्ध असल्याचे सांगून आजिनाथ मोहिते (रा. रस्तापूर) आणि रशीद इनामदार (रा. पानगाव) यांच्याकडूनही पैसे उकळले.

या प्रकरणात नितीन नागेश मोहिरे (रा. सदाशिव पेठ, पुणे) हा रेल्वे विभागातील उच्च अधिकारी असल्याचे भासवण्यात आले. त्याच्या IDBI बँक खात्यावर RTGS द्वारे पैसे जमा करण्यास सांगितले. यानुसार आजिनाथ मोहिते यांनी ७ एप्रिल ते ७ मे दरम्यान ३ लाख ८० हजार रुपये, तर रशीद इनामदार यांनी ४ लाख रुपये खात्यावर वर्ग केले.

लाखो रुपये घेतल्यानंतरही कोणालाही नोकरी मिळाली नाही. वारंवार चौकशी केल्यावर आरोपींनी टाळाटाळ केली आणि शेवटी मोबाइल बंद करून संपर्क तोडला. पैसे परत मागितल्यावर सुरेंद्र कुलकर्णीने दमदाटी करून उलट गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात सुरेंद्र कुलकर्णी, संकेत पायगुडे आणि नितीन मोहिरे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल