**बार्शीत बंदी असलेल्या ३ टन ‘मांगूर’ माशांची वाहतूक करणारी टोळी गजाआड; तालुका पोलिसांची मोठी कारवाई!**

**बार्शीत बंदी असलेल्या ३ टन ‘मांगूर’ माशांची वाहतूक करणारी टोळी गजाआड; तालुका पोलिसांची मोठी कारवाई!** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने बार्शी तालुका पोलिसांनी एक महत्त्वाची आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. शासनाने मानवी आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पूर्णपणे प्रतिबंधित घोषित केलेल्या थाई मांगूर (क्लारियास गारिएपिनस) जातीच्या माशांची ३ टन (३,००० किलो) जिवंत मासे वाहतूक करणाऱ्या तस्कर टोळीला पोलिसांनी रंगेहात पकडले. 

या कारवाईत आरोपींकडून तब्बल ३ टन जिवंत मांगूर मासे आणि त्यांच्या वाहतुकीसाठी वापरलेला अशोक लेलँड टेम्पो (क्र. KA 52 B 4687) जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.

२२ मे २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे २ वाजता पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव यांच्या पथकाने बार्शी बायपास रोडवरील परांडा चौक, नागोबाचीवाडी येथे एक टेम्पो संशयास्पदरित्या थांबलेला पाहिला. चालकाकडे केलेल्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांनी सखोल तपासणी केली. 

टेम्पोच्या मागील हौद्यात ताडपत्रीचा वापर करून कृत्रिम पाण्याचा हौद तयार करून त्यात जिवंत मांगूर मासे वाहतूक केले जात असल्याचे समोर आले.

     मत्स्य विभागाची पुष्टी
पोलिसांनी तातडीने सोलापूर मत्स्य व्यवसाय विभागाशी संपर्क साधला. विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे मासे प्रतिबंधित थाई मांगूर जातीचे असल्याची पुष्टी केली. हे मासे आक्रमक स्वभावाचे असून स्थानिक माशांच्या प्रजाती नष्ट करतात आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण करतात. यामुळे भारत सरकारने १९९७ पासूनच या माशांच्या उत्पादन, विक्री, संवर्धन आणि वाहतुकीवर पूर्ण बंदी घातली आहे.
         
            गुन्हा आणि कलमे
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४६/२६ नोंदवण्यात आला आहे. त्यात खालील कलमे लागू करण्यात आली आहेत:
 भारतीय न्याय संहिता (BNS): कलम २२३, २७५, ३(५)
- पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६: कलम १५
- अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६: कलम ५९

       कारवाई करणारे अधिकारी
ही कारवाई सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव, हेड कॉन्स्टेबल धनराज केकाण (१७४७), कॉन्स्टेबल राहुल बोंदर (७४७) आणि चालक कॉन्स्टेबल शिवशंकर खराडे (२४) यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल