**अक्कलकोटमध्ये एसीबीचा मोठा सापळा; पोलीस हवालदारासह तिघे लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात**
**अक्कलकोटमध्ये एसीबीचा मोठा सापळा; पोलीस हवालदारासह तिघे लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात**
**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात वापरल्या गेलेल्या स्कॉर्पिओ गाडी आणि मोबाईल परत देण्यासाठी तसेच संबंधितांना जामीन मिळवून देण्यासाठी १.२० लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचारी आणि एक खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. ही यशस्वी कारवाई मंगळवारी (१५ जून २०२६) सकाळी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यासमोर करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपींमध्ये अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार राजशेखर रामचंद्र कोळी (पोह/५६७), पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत दत्तात्रय देडे (पोकॉ/६१९) आणि खासगी इसम आकाश शरण्णाप्पा काडरामे (वय ३३, रा. अझाद गल्ली, अक्कलकोट) यांचा समावेश आहे. तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात सुरू आहे.
**घटनाक्रम काय?**
तक्रारदार यांच्या मित्राने फिरण्यासाठी स्कॉर्पिओ गाडी घेतली होती. ही गाडी गुन्हा नंबर ३६६/२०२६ मध्ये वापरली गेल्याचा संशय असल्याने कोळी आणि देडे यांनी चार दिवसांपूर्वी गाडी व तक्रारदारांच्या लहान भावाचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यानंतर तक्रारदारांच्या वडील आणि काकांना या गुन्ह्यात नाव घालून अटक करण्याची धमकी देत गाडी-मोबाईल परत देणे आणि जामीन मिळवून देण्यासाठी प्रथम १.४० लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १.२० लाख रुपयांवर सौदा झाला. ही रक्कम आकाश काडरामे यांच्याकडे स्वीकारण्यात येणार होती.
एसीबी सोलापूर युनिटला तक्रार मिळाल्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यासमोर पंचांसमक्ष आकाश काडरामे याने १.२० लाख रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तिघांना रंगेहाथ पकडले.
**कारवाई कोणाच्या मार्गदर्शनाखाली?**
ही कारवाई पोलीस उपायुक्त/अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर अधीक्षक अजित पाटील, अपर अधीक्षक अर्जुन भोसले आणि उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते, संतोष नरोटे, गजानन किणगी, अक्षय श्रीराम यांच्या पथकाने पार पाडली. तपास पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतेही शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ सोलापूर एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क : ०२१७-२३१२६६८ किंवा टोल फ्री १०६४.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या