**शिराढोण पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलवर लाचलुचपत विभागाची कारवाई*
**शिराढोण पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलवर लाचलुचपत विभागाची कारवाई**
**KDM NEWS धाराशिव (प्रतिनिधी):** छेडछाडीच्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शिराढोण पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अतुल संपत जाधव (वय ३४, पीसी नंबर १११६) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
दि. १८ जून २०२६ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात (ता. कळंब, जि. धाराशिव) हा गुन्हा नोंद झाला. आरोपी कोंबडवाडी, ता. धाराशिव येथील रहिवासी आहे.
तक्रारदार यांनी दि. २१ मे २०२६ रोजी लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्यात त्यांनी सांगितले की, त्यांच्या नातेवाइकाविरुद्ध आलेल्या छेडछाडीच्या अर्जावर कारवाई न करण्यासाठी जाधव यांनी ५ हजार रुपये लाच मागितली होती. विभागाने तक्रारीची दखल घेतली आणि शासकीय पंचांसमक्ष पडताळणी केली. जाधव यांनी लाचेची मागणी केल्याचे आणि २३ मे रोजी पैसे घेण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
**सापळा अयशस्वी**
दि. २३ मे २०२६ रोजी विभागाने सापळा रचला होता. मात्र आरोपीला संशय आल्याने त्याने लाच रक्कम स्वीकारली नाही. नंतर तक्रारदार यांनी १८ जून रोजी विभागाकडे संपर्क साधून पुढील कारवाई करण्याची विनंती केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विजय वगरे यांनी काम पाहिले तर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे आणि उप अधीक्षक योगेश वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही लोकसेवकाकडून लाच मागितल्यास किंवा भ्रष्टाचाराची माहिती असल्यास त्वरित विभागाशी संपर्क साधावा. संपर्क: ०२४७२-२२२८७९ किंवा ९०११०९२७७७.
ही घटना स्थानिक पोलिसांमधील भ्रष्टाचाराबाबत पुन्हा एकदा चर्चा निर्माण करणारी ठरली आहे. तपास सुरू असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईला वेग देण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या