**एफडीएची धडाकेबाज कारवाई; मुंबई-कराडमध्ये ३४.६१ लाखांचा अवैध सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त**
**KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, १५ जून: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) ने मिसब्रँडेड आणि अवैध सौंदर्यप्रसाधनांविरुद्ध मोहीम सुरू केली असून मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, कांदिवली व सातारा जिल्ह्यातील कराड येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये एकूण ३४ लाख ६१ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित आस्थापनांवर औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. भेसळयुक्त दुध आणि गुटख्याविरोधातील कारवाईनंतर आता सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात भ्रामक दावे, अपुरी माहिती आणि विनापरवाना उत्पादन-विक्री रोखण्यावर भर देण्यात आला आहे.
**कराड येथील मोठी कारवाई:**
१२ जून रोजी गोपनीय माहितीवरून कराडमधील राजलक्ष्मी टेलीकम्युनिकेशन या आस्थापनावर छापा टाकण्यात आला. येथे २९.४५ लाख रुपयांचा सौंदर्यप्रसाधनांचा साठा आढळला. बाह्य पॅकिंग आणि आतील बाटल्यांवरील माहितीत तफावत, बॅच नंबर, उत्पादन तारीख व उत्पादक तपशील नसल्याने या उत्पादनांना मिसब्रँडेड ठरवण्यात आले. विक्रीवर बंदी घालण्यात आली.
**क्रॉफर्ड मार्केट:**
१३ जून रोजी क्रॉफर्ड मार्केटमधील ‘ब्युटी सेंटर’वर तपासणीत १.२० लाख रुपयांचे उत्पादने जप्त करण्यात आली. स्तनवाढ, नितंबवाढ, वजन कमी करणे आदी भ्रामक दावे करणारी उत्पादने, ज्यात आवश्यक वैधानिक माहिती (बॅच नंबर, परवाना, उत्पादक तपशील) नव्हती.
**कांदिवली (पश्चिम):**
‘रेडियंट क्रिएशन्स’ या ठिकाणी विनापरवाना उत्पादन व साठवणूक सुरू असल्याचे उघडकीस आले. येथे सौंदर्यप्रसाधने, कच्चा माल आणि यंत्रसामग्री मिळून ३.९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एफडीएने जनतेला सावधान राहण्याचे आवाहन केले आहे. भ्रामक दावे असलेली किंवा अपुरी माहिती असणारी उत्पादने खरेदी करू नयेत, असे सांगण्यात आले. ही कारवाई सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी सुरू राहणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या