**बार्शीत फायनान्सचे बनावट एजंट बनून लुटणारी टोळी गजाआड; दोन आरोपींना पोलीस कोठडी!*
- बार्शीत फायनान्सचे बनावट एजंट बनून लुटणारी टोळी गजाआड; दोन आरोपींना पोलीस कोठडी!
**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी)**: फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचे भासवून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून लूट करण्याच्या टोळीला बार्शी तालुका पोलिसांनी केली अटक. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
रविवारी (१४ जून २०२६) दुपारी सतीश विजयराव हावळे (रा. दहिफळ, ता. कळंब, जि. धाराशिव) आपल्या मुलाच्या नावे असलेली हिरो पॅशन मोटारसायकल (एच २५ बी सी ३८८३) घेऊन बार्शीकडे येत होते. कुसळंब टोलनाक्याच्या पुढे एम.पी. पेट्रोल पंपाजवळ दोन आरोपींनी मोटारसायकलवरून पाठलाग करत त्यांना अडवले.
‘तुमच्या गाडीवर फायनान्सचे कर्ज आहे, आम्ही ती जप्त करणार आहोत,’ अशी बतावणी करत आरोपींनी गाडीची चावी हिसकावली. गाडीवर कर्ज नसल्याचे सांगूनही त्यांनी १२ हजार रुपयांची मागणी केली. भीतीपोटी फिर्यादीने १० हजार रुपये (फोन-पे व रोख) दिले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी चावी परत करताना फिर्यादीच्या बोटातील एक तोळ्याची सोन्याची अंगठी (किंमत सुमारे १ लाख रुपये) जबरदस्तीने काढून घेतली. तसेच मारहाण व शिवीगाळ करून धमकी दिली.
या घटनेनंतर सोमवारी (१५ जून २०२६) बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. भारतीय न्याय संहिता कलम १२७(७), ३०८(२), ३०९(४), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला आणि अनिकेत सुनील रसाळ (वय २६, रा. तुळजापूर रोड, मांगडे चाळ, बार्शी) व ओंकार दीपक परदेशी (वय २८, रा. भवानी पेठ, बार्शी) या दोघांना अटक केली. तपासात उघड झाले की, हे आरोपी श्रीराम फायनान्ससह इतर कंपन्यांचे एजंट बनून अवैध पद्धतीने लोकांना त्रास देत पैसे उकळत होते.
पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे. अशा प्रकारे फायनान्स कंपनीचे नाव वापरून कोणाचीही फसवणूक किंवा लूट झाल्यास बार्शी तालुका पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांनी केले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या