**बार्शीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात २८९३ लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ**
**बार्शीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात २८९३ लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ**
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ३१ जुलै : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानांतर्गत आज श्री संत तुकाराम सभागृह, श्री शिवाजी महाविद्यालय येथे भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त झालेल्या या शिबिरात बार्शी तालुक्यातील सुमारे तीन हजार नागरिक उपस्थित होते.
जिल्हा परिषद सोलापूरचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात आमदार राजेंद्र राऊत, आमदार दिलीप सोपल, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, पंचायत समिती सभापती मीनाक्षी रोंगे, संजय गांधी योजना समिती अध्यक्ष रणवीर राऊत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय गरड, उपसभापती संतोष निंबाळकर, उपनगराध्यक्ष रोहित पाटील यांच्यासह प्रांताधिकारी सदाशिव पाटील, तहसीलदार एफ. आर. शेख, नायब तहसीलदार बदे व सानप तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शिबिरात महसूल, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, कृषी, सहकार, परिवहन, भूमी अभिलेख व पुरवठा विभागांच्या योजनांची एकाच छताखाली अंमलबजावणी झाली. एकूण २८९३ लाभार्थ्यांना थेट लाभ मिळाला. त्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ५३०, पुरवठा विभागाकडून २८४ रेशन कार्ड, आरोग्य विभागाकडून ३७८ आयुष्मान कार्ड, सेतू विभागाकडून ५४० विविध दाखले, कृषी विभागाकडून १५७ लाभ आणि सहकार विभागाकडून ५३० आधार प्रमाणीकरण सेवांचा समावेश आहे. उत्पन्न-जात प्रमाणपत्रे, स्वामित्व कार्ड, शिष्यवृत्ती व कृषी साहित्य वाटपही मोठ्या प्रमाणात झाले.
उपस्थितांनी अशा शिबिरांमुळे योजना नागरिकांपर्यंत थेट पोहोचत असल्याचे आणि एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध झाल्याने वेळ व खर्च वाचल्याचे अधोरेखित केले. बार्शी तालुक्यातील हजारो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याने शिबिर यशस्वी ठरले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या