**मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दूध भेसळीचे मोठे रॅकेट उघड; FDAची धडक कारवाई**
**मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दूध भेसळीचे मोठे रॅकेट उघड; FDAची धडक कारवाई**
**KDM NEWS प्रतिनिधी मुंबई/छत्रपती संभाजीनगर:** अन्न व औषध प्रशासन (FDA) ने मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात केलेल्या छाप्यांमध्ये दूधात भेसळ आणि बनावट दूध तयार करण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. नामांकित ब्रँड्सच्या दुधात पाणी मिसळणे, व्हे पावडरचा वापर करून कृत्रिम दूध बनवणे अशा गंभीर प्रकारांमुळे घरातील लहान मुलं, वृद्धांसह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.
मुंबई-दहिसर: ब्रँडेड दुधाची टेम्परिंग
९ जुलै २०२६ रोजी पहाटे अन्न व औषध प्रशासन आणि गुन्हे शाखेच्या युनिट-१२ च्या संयुक्त पथकाने दहिसर पूर्वेतील दुबे चाळ येथे धाड टाकली. लिंगय्या भिक्षमया गणता (४२) याला नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पाऊच फोडून त्यात पाणी व इतर पदार्थ मिसळताना रंगेहाथ पकडले.
- **जप्त/नष्ट:** ४७० लीटर भेसळयुक्त दूध (किंमत सुमारे ₹२९,७५०).
- आरोपीला अटक करण्यात आली. दहिसर पोलिस ठाण्यात FIR दाखल.
- दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर-फुलंब्री: पावडरचा वापर
८ जुलै रोजी फुलंब्रीतील सिद्धेश्वर दुध डेअरीवर छापा टाकण्यात आला. येथे गोवर्धन आणि म्लेकपोल ब्रँडच्या व्हे परमीएट पावडरचा वापर करून बनावट दूध तयार केले जात होते.
- **जप्त:** गोवर्धन पावडर १९८ किलो, म्लेकपोल पावडर २९८ किलो (एकूण ४९६ किलो).
- **नष्ट:** ३,४९८ लीटर संशयास्पद मिश्र दूध.
- हे दूध शिवकृपा दुध डेअरीमार्फत मराठवाडा मिल्क प्रोड्युसर कंपनी आणि गुजरातमधील पंचमहाल सहकारी संघाकडे पुरवले जात होते.
दोन्ही डेअरींचे अन्न परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
गुन्हे आणि तपास
राजेंद्र जाधव, योगेश लहाने, बी.एम. इन्ग्रेडियंट्स आणि शिवकृपा डेअरी यांच्याविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात FIR नोंदवण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कलमे लावण्यात आली आहेत. पुढील तपास सुरू असून, आंतरजिल्हा आणि आंतरराज्यीय कनेक्शन तपासले जात आहेत.
FDA च्या या कारवाया राज्यभरातील दूध पुरवठा साखळीतील भेसळ रोखण्याच्या मोहिमेचा भाग आहेत. नागरिकांना प्रमाणित ब्रँड्स आणि विश्वसनीय स्रोतांमधून दूध खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
**#SafeFoodSafeMaharashtra**
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या