**बार्शीत निवृत्त बँक कर्मचाऱ्याची तब्बल २ कोटी १४ लाखांची ऑनलाइन फसवणूक; शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाला बळी**

**बार्शीत निवृत्त बँक कर्मचाऱ्याची तब्बल २ कोटी १४ लाखांची ऑनलाइन फसवणूक; शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाला बळी** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर ) – फेसबुकवरील शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आकर्षक जाहिरातीला भुलून बार्शीतील एका ६३ वर्षीय निवृत्त बँक कर्मचाऱ्याची तब्बल २ कोटी १४ लाख ९५ हजार ५७६ रुपये २० पैशांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५९७/२०२६ नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी मोहन जगन्नाथ गायकवाड (वय ६३, रा. १२८३ कसबा पेठ, एकविराई मंदिराजवळ, बार्शी) हे निवृत्त पेन्शनर आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये फेसबुक पाहत असताना त्यांना “२७ Acume” या नावाची शेअर मार्केटसंदर्भातील जाहिरात दिसली. त्यावर क्लिक केल्यानंतर त्यांना “२७ Acume Stock Capital” या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. त्यानंतर स्वतःला कंपनीचे प्रतिनिधी सांगणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधून दररोज ५ ते २५ टक्के परतावा मिळण्याचे आमिष दाखवत “Acume Pro App” डाउनलोड करण्यास सांगितले. केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे ट्रेडिंग खाते सुरू करण्यात आले.

सुरुवातीला अल्प रक्कम गुंतविल्यानंतर अॅपवर नफा दिसू लागला. काही वेळा काढलेली रक्कम बँक खात्यात जमा झाल्याने विश्वास दृढ झाला. त्यानंतर संबंधितांनी सातत्याने फोन करून अधिक गुंतवणूक करण्यासाठी दबाव टाकला. त्यानुसार फिर्यादीने १२ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध कंपन्यांच्या नावाने देण्यात आलेल्या बँक खात्यांमध्ये आरटीजीएस व यूपीआयद्वारे एकूण २,१४,९५,५७६.२० रुपये जमा केले.

काही दिवसांनी अॅपवरील शिल्लक व नफा मोठ्या प्रमाणात दिसत असतानाही प्रत्यक्ष पैसे काढता आले नाहीत. संबंधित व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्व मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आढळले. तसेच Acume Pro App हे अॅपही मोबाईलमधून आपोआप हटविले गेले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने ५ ऑगस्ट २०२६ रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणात खालील अॅप व संस्थांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे –  
१) Acume Pro App  
२) राधे एन्टरप्रायझेस  
३) ऍग्रो जेम्स केमिकल  
४) तानबा राम S.S.S  
५) न्यू व्होल्गा ट्रेडर्स  
६) बी.व्ही. ट्रेडर्स  
७) स्वास्तिक एन्टरप्रायजेस  
८) एस.व्ही.बी. एन्टरप्रायजेस  
९) अनुष्का शिक्षण प्रसारक मंडळ  
१०) रेणु सेवा / रेणुदार सर्विसेस  
११) शिवाशिव कन्स्ट्रक्शन  

भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६(२), ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(सी) व ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक गणेश कुभार यांच्याकडे सोपविण्यात आला असून, ऑनलाइन व्यवहार, संबंधित बँक खाती व व्यक्ती/संस्थांचा तपास सुरू आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**