**बार्शीतील नाकाबंदीत सराईत आरोपी गळाला; गावठी पिस्तूल, तलवार आणि ५ लाखांची कार जप्त, दोन जण फरार**
**बार्शीतील नाकाबंदीत सराईत आरोपी गळाला; गावठी पिस्तूल, तलवार आणि ५ लाखांची कार जप्त, दोन जण फरार**
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १२ ऑगस्ट : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या आदेशानुसार बार्शी शहर पोलिसांनी रात्री ते पहाटे सुरू असलेल्या नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान अवैध शस्त्रांविरुद्ध धडक कारवाई केली. हिरामठ हॉस्पिटल (सुभाषनगर) परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकताना एका आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून गावठी पिस्तूल, लोखंडी तलवार, धारदार चाकू आणि स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला.
दिनांक ११ ऑगस्ट रात्री ते १२ ऑगस्ट पहाटेदरम्यान बार्शी शहरात कॉम्बिंग व नाकाबंदी सुरू होती. बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, सुभाषनगर येथील हिरामठ हॉस्पिटल परिसरात एक संशयित इसम कमरेला पिस्तूल लावून स्विफ्ट डिझायर कारमध्ये बसला आहे आणि त्याच्यासोबत दोन इतर इसम आहेत. पोलिसांनी दोन पंचांसह त्वरित छापा टाकला. वाहन पाहताच दोन इसम अंधारात पळून गेले. मात्र, एकाला ताब्यात घेण्यात यश आले.
अटक आरोपी : सचिन कुमार मिरगणे (वय ३८, रा. सुभाषनगर, बार्शी). या आरोपीचा तडीपार कालावधी नुकताच संपला होता. पळून गेलेले संशयित : राहुल अनभुले व दत्ता उंदरे (दोघेही बार्शीचे).
जप्त मुद्देमाल :
- गावठी बनावटीचे पिस्तूल (मॅगझिनसह) – अंदाजे ५० हजार रुपये
- ३३ इंच पाते व ६ इंच मूठ असलेली लोखंडी तलवार – ४ हजार रुपये
- ४ इंच पिवळे पाते व काळ्या रंगाची मूठ असलेला धारदार चाकू – १ हजार रुपये
- राखेच्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (क्र. MH 14 EP 8402) – ५ लाख रुपये
एकूण किंमत ५ लाख ५५ हजार रुपये.
आरोपींकडे शस्त्रे बाळगण्याचा परवाना नव्हता. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांच्या शस्त्रविषयक जमावबंदी व निबंध आदेशाचे उल्लंघन झाल्याने भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, ४, २५; महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ आणि भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पो.कों. अजिज मनसुब शेख यांची आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वात पार पडली. पोलीस दलातील सपोनि सनील धनवे, पोसई अभयकुमार माकणे, सपोप्फो अजित वरपे, सूर्यकांत मगर, पोहेकों प्रविण साठे, सुनिल बनसोडे, मपोहेकों शबाना कोतवाल, सागर सुरवसे, सचिन देशमुख, अजिज शेख, अंकुश जाधव, दत्ता सोमवाड, अविनाश पवार, राहुल उदार, प्रल्हाद अकुलवार, सचिन नितनात, सतिश उघडे, सचिन राऊत, चापोका मस्के व चापोका झाडे यांनी कामगिरी केली.
नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शहरात बेकायदेशीर शस्त्रे, संशयास्पद हालचाली किंवा गैरप्रकार दिसल्यास तात्काळ पोलिसांना किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या