**बार्शीत श्रावण प्रवचनमालेचा भव्य प्रारंभ डॉ. जयवंत बोधले महाराजांच्या निरूपणातून श्रीमद् भागवताचे उद्धारसामर्थ्य अधोरेखित**

**बार्शीत श्रावण प्रवचनमालेचा भव्य प्रारंभ  
डॉ. जयवंत बोधले महाराजांच्या निरूपणातून श्रीमद् भागवताचे उद्धारसामर्थ्य अधोरेखित** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १५ ऑगस्ट :** श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त दरवर्षी होणाऱ्या प्रवचनमालेचा यावर्षीचा २३ वा अध्याय गुरुवार, १३ ऑगस्टपासून सुरू झाला. श्री भगवंत देवस्थान ट्रस्ट आणि श्री सद्गुरु बोधराज भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मालेत ह. भ. प. डॉ. जयवंत महाराज बोधले “श्रीमद्भागवत कथा चिंतन – भाग २” या विषयावर संपूर्ण महिनाभर सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत निरूपण करत आहेत. प्रारंभाच्या दिवशी मंदिरात हजारो भाविक उपस्थित होते.

डॉ. बोधले महाराज म्हणाले, “जगावे कसे हे भगवद्गीता सांगते, तर जगण्याचे सार्थक कसे करावे हे श्रीमद् भागवत सांगते.” त्यांनी सांगितले की श्रीमद् भागवत हा बारा स्कंध आणि अठरा हजार श्लोकांचा अध्यात्माचा दीप आहे. तो श्रीकृष्णाचे जीवनदर्शन असून राजा परीक्षिताला मृत्यूच्या भयापासून मुक्त करण्यासाठी शुकमुनींनी केलेला हितोपदेश आहे. श्रीकृष्ण निजधामास गेल्यानंतर पुंडलिकाच्या भक्तीने विठ्ठल रूपात पंढरपुरात अवतीर्ण झाले आणि ग्रंथरूपाने श्रीमद् भागवतात साकार झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्रीमद् भागवतात सृष्टीरचनेपासून जीवनातील विविध विषयांवर सखोल विचार आहे. त्यामुळे त्याचे श्रवण गुरुवर श्रद्धा ठेवून आणि मन स्थिर ठेवूनच केले पाहिजे. या ग्रंथात मानवी जीवनाचा उद्धार करण्याचे सामर्थ्य आहे, असे बोधले महाराज यांनी निरूपण केले. ते बार्शी तालुक्यातील धामणगावचे रहिवासी असून संत माणकोजी महाराज बोधले यांचे अकरावे वंशज आहेत.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. विलास जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. दादा बुडुख यांनी श्रीमद् भागवत ग्रंथाचे पूजन केले. श्रावणमासाच्या या प्रवचनमालेस सुरुवातीपासूनच भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रवचनमाला महिनाभर चालणार असल्याने भाविकांना रोज सायंकाळी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**