**नागपुरात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा भव्य नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान**
नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी आमदार संदीप जोशी, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्मानचिन्हासोबत नागपूर महानगरपालिकेतर्फे पाच लाख रुपये, विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे ५१ हजार रुपये आणि सिद्धीविनायक सेवा ट्रस्टतर्फे एक लाख रुपये असे धनादेश देण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मराठी माणसाच्या जीवनातील संघर्ष, वास्तव, मर्यादा, दुःख आणि आनंद अशोक सराफ यांच्या कलाकृतींमध्ये दिसतात. त्यांनी या भावभावनांना हास्याची आणि आनंदाची किनार दिली. मराठी सिनेमाला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करून वेगळी उंची दिली. कोट्यवधी लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या अशोकमामांचा हा सत्कार आहे. आजचा हा क्षण नागपूरकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे.”
ते पुढे म्हणाले की, नवव्या वर्गात ‘धुमधडाका’ चित्रपट पाहिल्यानंतर मराठी सिनेमाची गोडी लागली. अशोक सराफ हे केवळ सुपरस्टार नसून पिढ्यांचे भावनात्मक बंधन आहेत. रंगभूमी आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रांत त्यांनी उत्तुंग योगदान दिले आहे.
सराफ यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले, “आजच्या इतका भव्य सत्कार माझा आजवर झाला नाही. पण प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही आहोत.”
प्रारंभी अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी सराफ यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी सराफ यांनी वयाच्या सातव्या वर्षी एकांकिकेतून अभिनयाची सुरुवात, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत सुमारे ५० चित्रपट, विनोदातील नेमकेपणा आणि निरीक्षणाचे महत्त्व याबाबत मनमोकळेपणाने बोलले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या