**जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी अंतरमशागत करा; तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन**
**जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी अंतरमशागत करा; तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १२ ऑगस्ट :** बार्शी तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीचा वेग वाढला असून एकूण पेरणी क्षेत्र सरासरीपेक्षा जास्त झाले आहे. तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या साप्ताहिक अहवालानुसार, एकूण ७३ हजार १७७ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी आतापर्यंत ८७ हजार ४८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण ११९.५५ टक्के आहे.
सोयाबीनने सर्वाधिक वाढ दाखवली आहे. सरासरी ५६ हजार ४७२ हेक्टर क्षेत्राऐवजी ८२ हजार ८७५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. हे प्रमाण तब्बल १४६.७५ टक्के आहे. एकूण गळीतधान्यांचे पेरणी क्षेत्रही १४६.४६ टक्के गाठले आहे.
अन्नधान्यांच्या पेरणीत मात्र मंदी दिसून येत आहे. एकूण अन्नधान्य पेरणी केवळ २७.७३ टक्के झाली आहे. यात तूर ३९.५६ टक्के, उडीद १७.७४ टक्के तर मूग केवळ ९.३६ टक्के पेरणी झाली आहे. मक्याची पेरणी ६३.८२ टक्के पूर्ण झाली आहे. भात, ज्वारी, बाजरी, राळा आणि राजगिरा या पिकांची पेरणी अद्याप सुरू झालेली नाही.
तालुका कृषि अधिकाऱ्यांनी पावसाचा खंड असलेल्या भागात शेतकऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. कोळपणी व अंतरमशागत करून जमिनीतील ओलावा संरक्षित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाष्परोधकाची फवारणी करण्याची व उपलब्ध ठिकाणी सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.
हा अहवाल जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सोलापूर व उपविभागीय कृषि अधिकारी कुर्डवाडी यांना सादर करण्यात आला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या