*इन्स्टाग्रामची ओळख ठरली जीवघेणी; विवाहित महिलेशी संबंध ठेवणाऱ्या तरुणाची बेदम मारहाणीत हत्या*

**इन्स्टाग्रामची ओळख ठरली जीवघेणी; विवाहित महिलेशी संबंध ठेवणाऱ्या तरुणाची बेदम मारहाणीत हत्या** 

**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर:** इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या ४२ वर्षीय विवाहित महिलेसोबतचे संबंध अखेर २७ वर्षीय तरुणाला महागात पडले. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील तरटगाव येथील ट्रॅक्टर चालक अरविंद बाळू मस्के याची महिलेच्या पती, मुलगा आणि साथीदारांकडून बेदम मारहाण झाली. त्यात गंभीर जखमी झालेल्या अरविंदचा शनिवारी (२२ ऑगस्ट) सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

काही महिन्यांपूर्वी अरविंदची माळुंब्रा (तालुका तुळजापूर) येथील ४२ वर्षीय विवाहित महिलेशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. तीन महिने फोनवर बोलण्यानंतर एप्रिलमध्ये ती अरविंदच्या घरी आली आणि दोन दिवस राहिली. नंतर पुन्हा येऊन तिने लग्नाचा आग्रह धरला. दीड महिन्यांपूर्वी ती पुन्हा आली आणि सासरी परत गेलीच नाही. पती तिला न्यायला आला तेव्हा तिने नकार दिला आणि जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली.

काही दिवसांनी महिला पतीच्या घरी गेली. १३ ऑगस्टला अरविंदने आईला सांगितले की महिला भेटायला बोलवत आहे. १५ ऑगस्टला तो घराबाहेर पडला. माळुंब्राकडे जाणाऱ्या महामार्गावर महिलेचा पती, मुलगा आणि इतर तीन-चार जणांनी त्याला अडवून लोखंडी तार आणि चाबकाने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत पती-मुलगा त्याला तामलवाडी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी त्याला सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना २२ ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला.

मृताच्या आई रुक्मिणी मस्के यांनी तामलवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जातीय शिवीगाळ आणि खुनाचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. त्यावरून खून आणि अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. दोन संशयितांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. तपास पोलीस उपअधीक्षक मनोहर पाटील करीत आहेत. इतर आरोपी पळून गेल्याने शोध सुरू आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**